अवैध रेती टिप्परच्या धडकेने दोघे जायबंदी, शेतातून घरी येताना अपघात
By सदानंद सिरसाट | Published: January 19, 2024 03:14 PM2024-01-19T15:14:08+5:302024-01-19T15:15:14+5:30
या प्रकाराने संतप्त माटरगाव, जलंब परिसरातील ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळीच शेगाव तहसीलमध्ये धडक देत लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
जलंब (बुलढाणा) : रेतीमाफियांसाठी हिरवे कुरण असलेल्या शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून दैनंदिन ९० पेक्षाही अधिक वाहनांतून अवैध रेतीची वाहतूक करताना आतापर्यंत १५ जणांचा बळी घेतला आहे. त्यानंतर गुरुवारी रात्री ८ वाजता रेतीच्या टिप्परने शेतातून परतणाऱ्या दाेघांना उडविल्याने ते जायबंदी झाले. या प्रकाराने संतप्त माटरगाव, जलंब परिसरातील ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळीच शेगाव तहसीलमध्ये धडक देत लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना धारेवर धरले. माफियांशी साटेलोटे असलेल्यांची बदली करा; अन्यथा, आंदोलनाचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.
शेगाव तालुक्यातील खिरोडा ते कठोरा यादरम्यानच्या पूर्णा नदीपात्रात रेतीचा दिवसरात्र उपसा केला जात आहे. शासनाने रेतीघाटांचे लिलाव केला नसल्याने माफियांना हा भाग म्हणजे मोकळे कुरण असल्यासारखाच आहे. परिसरातील नदीपात्रातून १० केणी आणि ५ पोकलँड यंत्रांद्वारे रेतीचा दिवसरात्र उपसा केला जातो. त्या रेतीची शंभरपेक्षाही अधिक टिप्परद्वारे खामगाव, शेगाव, अकोला या शहरांत वाहतूक केली जाते. ती वाहने भरधाव असतात. त्यामुळेच जलंब परिसरात गेल्या दोन वर्षांत केवळ टिप्परच्या अपघातात १५ जणांचा बळी गेला. तोच प्रकार गुरुवारी रात्री ८ वाजता माटरगाव कृषी विद्यालयानजीक घडला.
माटरगाव येथील सचिन हिरळकार (२३), सुमेध उमाळे (२२) हे दोघे शेतातून घरी येताना विनाक्रमांकांच्या रेती टिप्परने त्यांना धडक दिली. त्यामध्ये सचिनचा पाय गुडघ्यापासून निकामी झाला तर उमाळेचा एक हात जायबंदी झाला. दोघांवर अकोल्यात उपचार सुरू आहेत. सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे रात्रीच ग्रामस्थ संतप्त झाले. शुक्रवारी सकाळीच शेकडो ग्रामस्थांनी शेगाव तहसील कार्यालयात धडक दिली. यावेळी तहसीलदार समाधान सोनवणे यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांच्या डोळ्यांदेखत हा प्रकार सुरू असल्याने त्यांच्यासह त्यांच्या शासकीय चालकाचे रेतीमाफियांशी असलेल्या संबंधांवरही ग्रामस्थांनी बोट ठेवले.
- खासदार, जिल्हाधिकारी संतापले
यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार ॲड. आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील शेगावात कार्यक्रमानिमित्त आले होते. ग्रामस्थांनी तेथे धाव घेत त्यांनाही जाब विचारला. लोकप्रतिनिधींमुळे माफियांसह अधिकाऱ्यांची हिंमत वाढल्याचा आरोप जलंबचे माजी सरपंच दिलीप शेजोळे यांनी केल्याने खासदारांनी तहसीलदार सोनवणे यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले.
- खामगावात रेतीमाफियांचा अड्डा
पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती मोठ्या प्रमाणात खामगावात येते. रात्री ८ ते सकाळी ६ वाजताच्या दरम्यान ताशी १०० किलोमीटरपेक्षा अधिक गतीने जलंब रस्त्याने अवैध टिप्पर धावतात. खामगावातील चार ते पाच रेतीमाफियांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. त्यामुळे जलंब-खामगाव रस्त्यातील वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
- सोमवारपर्यंत कारवाईचे आश्वासन
या प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सोमवारपर्यंत या प्रकाराला जबाबदार असलेल्यांसह इतरांवर कारवाई करून रेतीउपसा, वाहतूक बंद केली जाईल, असे आश्वासन संतप्त ग्रामस्थांना दिले.
- कारवाई न झाल्यास पुढची दिशा ठरवू
लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार येत्या सोमवारपर्यंत कारवाई आणि अवैध रेती वाहतूक बंद न झाल्यास रेतीच्या टिप्पर आणि चालकांचे काय करायचे, याची दिशा आम्ही ठरवू, असा इशारा माजी सरपंच दिलीप शेजोळे यांनी दिला.