बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 12:16 PM2021-01-09T12:16:45+5:302021-01-09T12:17:29+5:30
Buldana District General Hospital जे. बी. कुळकर्णी आणि एस. एम. अट्राले अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
बुलडाणा: जिल्हा सामान्य रुग्णालयातील कामकाजामध्ये अनियमितता केल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जे. बी. कुळकर्णी आणि एस. एम. अट्राले अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
यासंदर्भात एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष शैलेश खेडकर यांनी आरोग्य विभागाचे मुंबई येथील संचालक यांच्याकडे जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या कथीत अनियमितता, गैरप्रकारासंदर्भात तक्रार केली होती. त्यामध्ये झालेल्या प्राथमिक चौकशीत वरिष्ठ लिपिक जे. बी. कुळकर्णी आणि कनिष्ठ लिपिक एस. एम. अट्राले दोषी आढळून आल्याने त्यांचे हे निलंबन करण्यात आले आहे. ३१ डिसेंबर रोजी यासंदर्भातील आदेश जिल्हा सामान्य रुग्णालयात धडकले होते. निलंबन काळात दोघांचेही मुख्यालय हे वाशिम राहणार आहे. दरम्यान, शैलेश खेडकर यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने कथित स्तरावरील सागवान घोटाळा, सेंट्रल ऑक्सिजन पाइपलाइन घोटाळा, साहित्य खरेदी घोटाळा यांसह अन्य प्रकरणासंदर्भातही कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कोण दोषी आढळते, याकडे सध्या लक्ष लागून आहे. यापूर्वी या प्रकरणांमध्ये काही अधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे येऊन चौकशी केली होती. त्यानंतर उपरोक्त कारवाई झाली होती.