१४ लाखांचा घोटाळा करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Published: July 13, 2017 12:30 AM2017-07-13T00:30:05+5:302017-07-13T00:30:05+5:30

एका आरोपीस अटक : १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी, वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्रातील पगार घोटाळा

Two employees of Rs 14 lakh scam | १४ लाखांचा घोटाळा करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

१४ लाखांचा घोटाळा करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : तालुक्यातील वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पगार घोटाळ्यातील आरोपानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या चौकशीअंती ३९ लाख रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनला ११ जुलै रोजी संबंधित दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. या आरोपीस आज न्यायालयात उभे केले असता त्यास १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या घोटाळ्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
सदर प्रकरणी वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. गणेश प्रल्हाद राठोड यांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली, की १ जानेवारी २०१४ पासून वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असून, मे २०१५ रोजी आपल्याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रभार देण्यात आला होता. या आरोग्य केंद्रात एकूण २२ कर्मचारी कार्यरत असून, त्यात कनिष्ठ सहायक म्हणून गजानन शंकर राजूरकर तसेच आरोग्य सेवक म्हणून पुरुषोत्तम सरदारसिंह साळोक कार्यरत आहेत. आॅक्टोबर २०१६ मध्ये आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना पगार पत्रक देण्यात आले होते, त्यात काही कर्मचाऱ्यांच्या पगारात पैसे कमी आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणी जून २०१५ पासून आॅक्टोबर २०१६ पर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार पत्रकांची तपासणी केली असता, कनिष्ठ सहायक म्हणून गजानन शंकर राजूरकर तसेच आरोग्यसेवक म्हणून पुरूषोत्तम सरदारसिंह साळोक यांनी संगनमत करून काही कर्मचाऱ्यांचे पगारातील रक्कम आपल्या बँक खात्यात वळती केली. आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारातून ५ लाख ८१ हजार ३४ रुपये तसेच इतर देयकामधून ८ लाख ३ हजार २९४ रुपये, असे एकूण १३ लाख ८४ हजार ३२८ रुपयांचा घोटाळा करून व्हाऊचरवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून सदर रक्कम दोघांनी वाटून आपल्या खात्यात अवैधरीत्या वळती केल्याचे दिसून आले. कनिष्ठ सहायक राजूरकरने आपल्या बँक खात्यात ६ लाख २ हजार ४७८ रुपये, तसेच आरोग्य सेवक पुरूषोत्तम साळोकयाने आपल्या बँक खात्यात ७ लाख ८१ हजार ८०५ रुपये वळती केले, अशा तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भादंवि ४२०, ४६८, ४७१, ४०९, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव यांनी आरोपी पुरूषोत्तम साळोक यास उशिरा रात्री अटक करून बुधवारी न्यायालयात उभे केले. यावेळी न्यायालयाने आरोपी साळोक यास १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला, तर याप्रकरणी आरोपी व मुख्य सूत्रधार गजानन राजूरकर फरार आहे.

आरोग्य विभागाच्या चौकशीत ३९ लाखांचा घोटाळा
वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात पैसे कमी मिळत असल्याचा संशयावरून काही कर्मचाऱ्यांनी डॉ. गणेश राठोड यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी प्राथमिक चौकशी केली असताना पगारात गडबड असल्याचे दिसून आल्यानंतर याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांना दिली. दरम्यान, डॉ. शिवाजी पवार यांनी या घोटाळ्याच्या चौकशीसाठी दोन सदस्य असलेली समिती गठित केली. या समितीत बुलडाणा तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ.पी.एन. बडे व जिल्हा परिषदेचे सहायक लेखाधिकारी रविकुमार झनके यांचा समावेश होता. या समितीने केलेल्या चौकशीत सदर पगार घोटाळा ३९ लाख रुपयांचा असल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने त्वरित कार्यवाही करीत कनिष्ठ सहायक गजानन राजूरकर व आरोग्य सेवक पुरुषोत्तम साळोक यांना निलंबित केले.

वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्रातील घोटाळाप्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यास अटक करून गुन्हा दाखल करण्यात येईल.
-सुनील जाधव, ठाणेदार, बुलडाणा ग्रामीण.

Web Title: Two employees of Rs 14 lakh scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.