हनुमान सागर धरणाचे दोन दरवाजे ५० से.मी उघडले
By योगेश देऊळकार | Published: September 1, 2024 11:42 PM2024-09-01T23:42:20+5:302024-09-01T23:42:53+5:30
रविवारी रात्री ११ वाजता पासून धरणातून वान नदीपात्रात २८५० क्युसेसने पाण्याचा विसर्ग:नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
योगेश देऊळकार, अझहर अली, लोकमत न्यूज नेटवर्क, संग्रामपूर:- अमरावती अकोला बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या सीमेवरील वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणाचे दरवाजे रविवारी रात्री ११ वाजता दरम्यान ५० सेमी ने उघडण्यात आले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने धरणाच्या जलाशय पातळीत प्रचंड वाढ होत आहे. हनुमान सागर धरणातून वान नदीपात्रात २ हजार ८५० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे अथवा कमी करणे याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास धरणाची जलाशय पातळी समुद्रसपाटीपासून ४१० मी. असून धरणात ८८.११ टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे. या धरणावर बूलढाणा जिल्हयातील खारपाणपट्ट्यातील संग्रामपूर, जळगाव जा., शेगाव हे ३ तालुके तर अकोला जिल्हयातील तेल्हारा, अकोट तालुका व शहर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. दरम्यान धरणातून पाणी सोडण्यात आल्याने वान नदीला पूर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर वान प्रकल्प पूर नियंत्रण कक्षेकडून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.