तानाजी चित्रपट पाहताना थिएटरमध्ये दोन गट भिडले; खुर्च्या फेकून मारल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 20:44 IST2020-01-13T20:43:07+5:302020-01-13T20:44:29+5:30
गजानन टॉकीजमध्ये तानाजी सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या दोन युवकांच्या गटात क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली.

तानाजी चित्रपट पाहताना थिएटरमध्ये दोन गट भिडले; खुर्च्या फेकून मारल्या
खामगाव : येथील गजानन टॉकीजमध्ये तानाजी सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या दोन युवकांच्या गटात क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली. ही घटना रविवारी रात्री घडली. यात दोघे जण जखमी झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संजय बाळापूरे (१९) रा. दाळफैल याने शहर पोस्टेला तक्रार दिली की, तो व त्याचे मित्र गौरव रूद्रकार, भारत लांजूळकर, महादेव बाभुळकर, सौरव रूद्रकार, अनिकेत ठोसर व सागर देशमुख असे सात जण रविवारी रात्री गजानन टॉकीजमध्ये ९ ते १२ चा शो पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान, यातील गौरव रूद्रकार आणि भारत लांजूळकर हे सिनेमा हॉलमधील बाथरूमला गेले असता, बाथरूम जवळील सिटवर सिनेमा पाहण्यासाठी बसलेले उमेश कदम, गणेश बेटवाल, सुरा उर्फ सुरज गुरव या तिघांनी विनाकारण त्यांना बाथरूमचा दरवाजा बंद करण्यासाठी आरडा-ओरड करत शिवीगाळ केली.
दरम्यान, बाथरूम बाहेर आलेल्या भारत आणि गौरवने त्यांना हटकले असता, यातील गणेश बेटवाल याने गौरव रुद्रकार याच्या डोक्यात खुर्ची मारून जखमी केले. दरम्यान उमेश कदम यानेही दुसरी खुर्ची उचलून भारत लांजुळकर याच्या डोक्यात मारून त्यालाही जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त तिघांविरूध्द कलम ३२४, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)