सायंकाळी दोन तास दूध संकलन व वितरणास मुभा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:36 AM2021-04-22T04:36:08+5:302021-04-22T04:36:08+5:30
दूध उत्पादक शेतकरी आणि दूध डेअरीवाल्यांचा विचार न करताच शासनाने आदेश काढल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. दूध नाशवंत आहे. ...
दूध उत्पादक शेतकरी आणि दूध डेअरीवाल्यांचा विचार न करताच शासनाने आदेश काढल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. दूध नाशवंत आहे. त्यामुळे पशुपालकांचेच नुकसान होईल, ही समस्या तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडली. घरपोच दूध वितरणाला परवानगी असली तरी मनुष्यबळ नसल्याने घरपोच वाटप शक्य होत नसल्याचा महत्त्वाचा प्रश्नही तुपकरांनी यावेळी उपस्थित केला. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी २० एप्रिलच्या आदेशात बदल करून जिल्ह्यातील दूध संकलन व वितरण केंद्रे (दूध डेअरी) सायंकाळीदेखील ६ ते रात्री ८ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली. या निर्णयामुळे सकाळी ७ ते ११ या वेळेनंतर आता सायंकाळी आणखी दोन तास मुभा मिळाली आहे. याखेरीज घरपोच दूध वाटपाकरिता सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सवलत राहणार आहे. यावेळी स्वाभिमानीचे राणा चंदन, विजय बोराडे, शेख रफिक शेख करीम यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
दुधाबाबत आदेशात सुधारणा करणारा पहिला जिल्हा
राज्य शासनाने जीवनावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच परवानगी दिली आहे. त्यामध्ये दूध संकलन व वितरणाचाही समावेश होता. मात्र, रविकांत तुपकर यांनी या नुकसानकारक निर्णयात बदल करण्याची मागणी केली. अखेर प्रशासनाला शासनाच्या आदेशात सुधारणा करावी लागली. सुधारित आदेश काढावा लागणारा बुलडाणा जिल्हा रविकांत तुपकरांच्या प्रयत्नाने राज्यात पहिला ठरला आहे.
जयंत पाटलांशी यशस्वी चर्चा
दुधाकरिता आदेशात सुधारणा करण्याकरिता रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्रव्यवहार केला. तत्पूर्वी मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी रविकांत तुपकर यांनी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली असून, सायंकाळीदेखील दूध संकलन व वितरणाला सवलत मिळायला हवी, अशी मागणी केली.