जीप-मालवाहूच्या धडकेत दोन ठार, १२ जखमी
By admin | Published: May 19, 2017 12:18 AM2017-05-19T00:18:51+5:302017-05-19T00:18:51+5:30
मोताळा: नांदुरा ते मोताळा मार्गावर वरूड फाट्यानजिक जीप व मालवाहूमध्ये झालेल्या धडकेत दोन जण ठार, तर १२ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९:३० वाजता घडली.
मोताळा-नांदुरा मार्गावरील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा: नांदुरा ते मोताळा मार्गावर वरूड फाट्यानजिक जीप व मालवाहूमध्ये झालेल्या धडकेत दोन जण ठार, तर १२ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९:३० वाजता घडली.
मोताळा येथील मोहम्मद बशीर (पीर साहब) हे आपल्या कुटुंबीयांसमवेत मालवाहू क्रमांक एम. एच. २८ आर ३३८६ ने १८ मे रोजी नांदुऱ्याकडे निघाले होते. दरम्यान वरूड फाट्यानजिक सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास नांदुऱ्याकडून काही व्यापारी जीप क्रमांक एम. एच. २८ एबी १९७६ मधून मोताळ्याकडे येत होते. दरम्यान, रस्त्यात असलेला खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि जीप दोनदा उलटून समोरून येणाऱ्या मालवाहूवर जाऊन आदळली. या अपघातात मालवाहूमधील इदुलनिसाबी महमुददुीन (वय ३५) रा. जबलपूर व जीपमधील महम्मद आरिफ अब्दुल रशीद रा. नांदुरा (मोतीनगर) हे ठार झाले. तर, दोन्ही वाहनातील असलम शाह वजीर शाह (वय २८), मो. बशीर पीर साहब (वय ६०), शामीया अंजुम मो. बशीर (वय ५०), सानिया बी मो. बशीर (वय १६), सानिया अंजुम शेख नसीर (वय ६), मो. सगीर मो. बशीर (वय १८), सानिया अंजुम (वय १६), मो. जहांगीर (वय २४), रेहान खान (वय ३५), कय्युम खान अलीम खान (वय २६), शेख उमेर शेख साबीर (वय २३), सादीर खान हमीद खान (वय २१) असे १२ जण जखमी झाले.
बोराखेडी पोलिसांनी जखमींना तत्काळ विविध वाहनांद्वारे बुलडाणा येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. जखमींपैकी एकास बुलडाणा येथून औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, तहसीलदार वैशाली देवकर, संग्रामपूरचे तहसीलदार एल. के. चव्हाण व मोताळा तहसीलदार रूपेश खंडारे यांनी रुग्णालयात येऊन घटनेची माहिती व विचारपूस केली.
अपघातात मालवाहूचा चुराडा झाला असून, जखमींच्या हात, पाय व तोंडाला गंभीर मार लागला आहे. जखमींमध्ये ६ व १६ वर्षांची मुलगी असून, सहा वर्षांच्या मुलीचा हात फ्रॅक्चर झाला आहे.
अॅपेमधील मृतक महिला (जबलपूर) ही मोताळा येथे आपल्या भावाकडे पाहुणी म्हणून आली होती. मालवाहूमध्ये मोताळ्याच्या आठवडी बाजारासाठी येत असलेले व्यापारी व त्यांचा कांदा, लसणाचा माल होता. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या प्रकरणी असलमशाह वजीरशाह (वय २५) रा. मोताळा यांनी बोराखेडी ठाण्यात फिर्याद दाखल केली. जीपच्या चालकाविरुद्ध कलम २७९, ३३७, ३०४ अ, ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.