अनियंत्रित रुग्णवाहिकेने पाच जणांना चिरडले; दोन ठार, तीन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 06:30 PM2021-03-17T18:30:14+5:302021-03-17T18:34:50+5:30
Buldhana Accident News अपघातामध्ये अनिल पडोळकर आणि माया पडोळकर यांचा मृत्यू झाला आहे.
बुलडाणा: शहरातील त्रिशरण चौक परिसरात धावत्या रुग्णवाहिकेचे समोरील चाकाचे टायर फुटल्याने रस्त्याच्याकडेला पालामध्ये झोपलेले पाच जण चिरडल्या गेल्याची घटना १६ मार्च रोजी मध्यरात्री घडली. दरम्यान, यातील दोघांचा मृत्यू झाला असून तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. तिघाही गंभीर जखमीवर अकोला येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.या अपघातामध्ये अनिल पडोळकर आणि माया पडोळकर यांचा मृत्यू झाला आहे. अनिल पडोळकर याचा बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तर माया पडोळकर हिचा अकोला येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातातील बेबीबाई शेषराव सोळंकी, शेषराव सोळंकी आणि आकाश पडोळकर यांच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी रुग्णवाहिका चालक रामदास पुंजाजी जाधव (कोलवड) यास अटक केली आहे. सध्या पोलिस त्याची चौकशी करत आहेत.
एमएच-२८- बी-७१३६ क्रमांकाची रुग्णवाहिका घेवून रामदास पुंजाजी जाधव हा चालक मेहकर येथे एका मृत व्यक्तीचे पार्थिव घेवून गेला होता. दरम्यान रात्री एक वाजेच्या सुमारास मेहकरवरून बुलडाणा शहरात तो परत आला होता. दरम्यान महावितरण कार्यालयाकडून त्रिशरण चौकाकडे जात असताना त्याच्या रुग्णवाहिकेच्या समोरील चाकाचे टायर फुटल्याने त्याचे रुग्णवाहिकेवरील नियंत्रण सुटले. व रस्त्याच्या कडेला पालामध्ये झोपलेल्या चिखली तालुक्यातील सोळंकी व पडोळकर कुटुंबाच्या पालामध्ये त्याची रुग्ण वाहिका घुसली. त्यामध्ये उपरोक्त पाचही जण गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून जखमींना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले. यातील अनिल पडोळकर याचा बुलडाणा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर गंभीर अवस्थेतील अन्य चौघांना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले. अकोला येथे रुग्णालयात उपचारादरम्यान माया पडोळकर यांचा मृत्यू झाला. अन्य तिघांवर तेथे उपचार करण्यात येत आहे. पडोळकर व सोळंकी कुटुंब हे बुलडाणा शहरात त्रिशरण चौक परिसरात विळे, कुऱ्हाडी, तवे विकण्याचे काम करत होते. रस्त्याच्या कडेलाच ते पाल टाकून झोपत होते. या प्रकरणी पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
डाव्या बाजूकडील टायर फुटले
रुग्णवाहिकेचे समोरील डाव्या बाजूचे टायर फुटल्याने हा अपघात घडला. यात चालक रामदास पुंजाजी जाधव याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेलाच पालामध्ये झोपलेल्या या कुटुंबतील दोघांचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी रुग्णवाहिकाही ताब्यात घेतली असून चालक रामदास पुंजाजी जाधव याची चौकशी करण्यात येत असल्याचे तपासी अधिकारी जयसिंग पाटील यांनी स्पष्ट केले.