दोन अपघातांमध्ये दोन ठार
By Admin | Published: January 29, 2017 11:55 PM2017-01-29T23:55:19+5:302017-01-29T23:58:35+5:30
बीड/गेवराई : तालुक्यातील नवगण राजुरीजवळ अज्ञात ट्रकने टेम्पोला धडक दिली. यात चालक जागीच ठार झाला, तर गेवराई तालुक्यातील खांडवी फाटा येथे भरधाव कार विद्युत खांबावर धडकून एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला.
बीड/गेवराई : तालुक्यातील नवगण राजुरीजवळ अज्ञात ट्रकने टेम्पोला धडक दिली. यात चालक जागीच ठार झाला, तर गेवराई तालुक्यातील खांडवी फाटा येथे भरधाव कार विद्युत खांबावर धडकून एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री या दोन्ही घटना घडल्या.
राजुरीजवळ अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव सीताराम आसाराम ढोले (३८, रा. बार्शी नाका, बीड) असे आहे. ते टेम्पो (क्र. एमएच-०२ टी-६३५८) मध्ये नगरला भाडे घेऊन गेले होते. तेथे माल उतरवून रात्री बीडकडे येत होते. नवगण राजुरी शिवारातील गजानन कारखान्यासमोर थुंकण्यासाठी त्यांनी डोके व हात बाहेर काढले. यावेळी समोरून येणाऱ्या भरधाव अज्ञात ट्रकने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर इजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ग्रामीण ठाण्याचे पोहेकॉ. शांताराम रोकडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदणीची प्रक्रिया सुरू होती.
दुसऱ्या घटनेत परळी येथील गुळाचे व्यापारी राजगोपाल रामनारायण लड्डा (५० रा. ओपळे गल्ली, परळी) हे कार (क्र. एमएच ४४ के - ४१११) मधून रविवारी परळीहून नंदूरबारकडे जात होते. खांडवी फाट्यावर चालकाचा ताबा सुटल्याने कार पुलालगत असलेल्या विद्युत खांबावर आदळली. यात लड्डा यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक किरकोळ जखमी आहे. त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्री उशिरापर्यंत गेवराई ठाण्यामध्ये याप्रकरणी नोंद करण्यात आली नव्हती. (प्रतिनिधी)