इसरखेड ग्रामपंचायतच्या दोन सदस्यांना अटक
By admin | Published: November 19, 2016 12:25 AM2016-11-19T00:25:02+5:302016-11-19T00:25:02+5:30
जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
नांदुरा, दि. १८- जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक करणार्या तालुक्यातील इसरखेड येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध नायब तहसीलदार दिनकर जुगनाळे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून, आज (ता.१८) सकाळी त्यांना अटक केली. कडू सुखदेव कांडेलकर (वय ६८) व दिनकर शंकर कांडेलकर (वय ६५) अशी आरोपींची नावे असून, या दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
याबाबत सविस्तर वृत्त असे, की सन २0१३ मध्ये तालुक्यातील इसरखेड ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान तेथील कडू सुखदेव कांडेलकर व दिनकर शंकर कांडेलकर या दोघांनी महादेव कोळी या जातीचे खोटे प्रमाणपत्र देऊन अविरोध निवडून येऊन शासनाची फसवणूक केली. अशी तक्रार फिर्यादी दिनकर जुगनाके (नायब तहसीलदार) नांदुरा यांनी १५ नोव्हेंबर रोजी नांदुरा पोलीस स्टेशनला दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ४२0, ४६८, ४७१ अन्वये भादंविच्या गुन्ह्याची नोंद करून दोघा आरोपींना आज सकाळी अटक केली. अटकेनंतर आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय मिसाळे हे करीत आहेत.