विजेचा शॉक लागून नाट्यमंडळातील दोन जणांचा मृत्यू, एक जखमी

By निलेश जोशी | Published: November 22, 2023 05:47 PM2023-11-22T17:47:24+5:302023-11-22T17:49:25+5:30

पान्हेरा खेडी येथील सती कान्हू माता यांची यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे. २२ नोव्हेंबर पासून या यात्रेस प्रारंभ झाला.

Two members of the theater troupe died, one was injured due to electric shock | विजेचा शॉक लागून नाट्यमंडळातील दोन जणांचा मृत्यू, एक जखमी

विजेचा शॉक लागून नाट्यमंडळातील दोन जणांचा मृत्यू, एक जखमी

बुलढाणा: मोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडी येथील सती कान्हू माता यात्रेत वाहनातील साहित्य खाली उतरवलत असतांना तिघांना शॉक लागून त्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. दरम्यान तिसऱ्या जखमीवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अंकूश अनिल वारूळे (रा. वारूळ वाडी, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) आणि विशाल गॅरेज भोसले (रा. गणपती राजूर, जि. जालना) अशी या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. ३५ ते ४० वर्षादरम्यान या मृतकांची नावे आहे.

पान्हेरा खेडी येथील सती कान्हू माता यांची यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे. २२ नोव्हेंबर पासून या यात्रेस प्रारंभ झाला. दरम्यान या यात्रेमध्ये जळगाव येथील आनंद लोकनाट्य तमाशामंडळ आले होते. या तमाशाच्या तंबूची उभारणी करण्याचे काम सुरू होते. यावेळी मालवाहू वाहनातून साहित्य खाली उतरवत असतांना वीज प्रवाह असलेल्या तारांना एकाच्या हातातील पाईपचा स्पर्श झाल्याने त्याच्यासह वाहनाजवळ काम करत असलेल्या दोघांना वीजेचा धक्का लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. दरम्यान त्यांना प्रथम धामणगाव बढे प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी यातील दोघांना मृत घोषित केले. तिसरा जखमी राहूल शंकर जाधव (२०, रा. घनसोली, मुंबई) याच्यावरही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. वाहनातील साहित्य काढत असतांना एकाच्या हातातील पाईपचा स्पर्श वीज प्रवाह असलेल्या तारांना झाला आणि त्यातून ही दुर्घटना घडली. मृतांपैकी एक जण साऊंड ऑपरेटर असून एक जण मजूर होता. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

मंडळातील अनेकांना अश्रू अनावर

ही दुर्देवी घटना डोळ्यासमोर पहाल्याने अनेकांची घबराट झाली होती. मंडळातील अनेकांना आश्रू अनावर झाले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयातही मृतकांच्या पत्नी व नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता. सिद्धार्थ गरबडे (नजीक पांग्री, बदनापूर, जि. जालना) याच्यासह त्याच्या सहकाऱ्यांनी यावेळी या कुटुंबांना सावरण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Two members of the theater troupe died, one was injured due to electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.