वाघ-बिबट्याच्या नखांच्या तस्करीप्रकरणी आणखी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 06:08 PM2021-07-15T18:08:16+5:302021-07-15T18:08:53+5:30
Two more arrested for smuggling tiger-leopard claws : वनविभागाने जळगाव जामोद आणि जळगाव खान्देश येथून या प्रकरणाशी संबंधित आणखी दोन जणांना अटक केली आहे
बुलडाणा: वाघ-बिबट्याच्या नखांच्या तस्करी प्रकरणी नांदुरा येथून तीन जणांना अटक करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा वनविभागाने जळगाव जामोद आणि जळगाव खान्देश येथून या प्रकरणाशी संबंधित आणखी दोन जणांना अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणात वन्यजीवांचे आणखी काही अवशेषही जप्त होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.त्यामुळे अटक आरोपींचीही नावे वनविभागाने गुलदस्त्यात ठेवली आहेत.
वाघ व बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना दहा नखांसह वन विभागाने १३ जुलै रोजी नांदुरा येथून अटक केली होती. त्यांच्याकडून एक दुचाकी आणि तीन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. मुंबई येथील वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो आणि अमरावती येथील मेळघाट वाइल्ड लाइफ क्राइम सेलच्या सहकार्याने बुलडाणा वनविभागाने (प्रादेशिक) ही कारवाई नांदुरा येथील प्रसिद्ध हनुमान मूर्ती परिसरात केली होती. १३ जुलै रोजी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन आरोपी जळगाव खान्देश जिल्ह्याातील तर एक आरोपी बुलडाणा जिल्ह्यातील होता. त्यांना नांदुरा न्यायालायने १७ जुलै पर्यंत वन कोठडी दिली होती. प्रकरणाच्या तपासात आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारावर १५ जुलै रोजी जळगाव जामोद येथून एक आणि जळगाव खान्देश जिल्ह्यातून एक असा दोघांना अटक करण्यात आली आहे. तपासात आणखी काही मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वन विभाग व्यक्त करत आहे. त्यामुळे अटक आरोपींची नावे वनविभागाने उघड करण्यास तुर्तास नकार दिला आहे.
--‘त्या’ आरोपींनाही वन कोठडी--
गुरूवारी अटक करण्यात आलेल्या आरोपींनाही वन विभागाने न्यायालयासमोर हजर केले असता त्यांचीही १७ जुलै पर्यंत वन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दुसरीकडे जप्त करण्यात आलेली नखे फॉरेन्सीक तपासणीसाठी प्रसंगी डेहरादून किंवा हैदराबाद येथे पाठविली जाणार असल्याचे संकेत वन विभागातील सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही नखे बिबट्याची आहेत की वाघाची आहेत हे स्पष्ट होईल. मात्र याप्रकरणात वनविभागा आणखी काही मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्याची शक्यता आहे.