वाघ-बिबट्याच्या नखांच्या तस्करीप्रकरणी आणखी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:24 AM2021-07-16T04:24:39+5:302021-07-16T04:24:39+5:30
वाघ व बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना दहा नखांसह वन विभागाने १३ जुलै रोजी नांदुरा येथून अटक केली ...
वाघ व बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना दहा नखांसह वन विभागाने १३ जुलै रोजी नांदुरा येथून अटक केली होती. त्यांच्याकडून एक दुचाकी आणि तीन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. मुंबई येथील वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो आणि अमरावती येथील मेळघाट वाइल्ड लाइफ क्राइम सेलच्या सहकार्याने बुलडाणा वनविभागाने (प्रादेशिक) ही कारवाई नांदुरा येथील प्रसिद्ध हनुमान मूर्ती परिसरात केली होती. १३ जुलै रोजी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन आरोपी जळगाव खान्देश जिल्ह्यातील तर एक आरोपी बुलडाणा जिल्ह्यातील होता. त्यांना नांदुरा न्यायालयाने १७ जुलैपर्यंत वन कोठडी दिली होती. प्रकरणाच्या तपासात आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारावर १५ जुलै रोजी जळगाव जामोद येथून एक आणि जळगाव खान्देश जिल्ह्यातून एक असे दोघांना अटक करण्यात आले आहे. तपासात आणखी काही मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वन विभाग व्यक्त करीत आहे. त्यामुळे अटक आरोपींची नावे वनविभागाने उघड करण्यास तूर्तास नकार दिला आहे.
--‘त्या’ आरोपींनाही वन कोठडी--
गुरुवारी अटक करण्यात आलेल्या आरोपींनाही वन विभागाने न्यायालयासमोर हजर केले असता त्यांचीही १७ जुलैपर्यंत वन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दुसरीकडे जप्त करण्यात आलेली नखे फॉरेन्सीक तपासणीसाठी प्रसंगी डेहराडून किंवा हैदराबाद येथे पाठविली जाणार असल्याचे संकेत वन विभागातील सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही नखे बिबट्याची आहेत की वाघाची आहेत हे स्पष्ट होईल. मात्र, याप्रकरणात वनविभाग आणखी काही मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्याची शक्यता आहे.