किन्होळा कोविड सेंटरला दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:25 AM2021-05-31T04:25:32+5:302021-05-31T04:25:32+5:30
रविकांत तुपकर यांनी ग्रामीण भागात गावागावांमध्ये आयसोलेशन सेंटर निर्माण व्हावे, अशी संकल्पना मांडली आणि त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या संकल्पनेतून ...
रविकांत तुपकर यांनी ग्रामीण भागात गावागावांमध्ये आयसोलेशन सेंटर निर्माण व्हावे, अशी संकल्पना मांडली आणि त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या संकल्पनेतून आणि किन्होळा ग्रामस्थांच्या पुढाकाराने किन्होळ्यात लोकसहभागातून जिल्ह्यातील पहिले आयसोलेशन सेंटर सुरू झाले. किन्होळा पॅटर्नची चर्चा संपूर्ण राज्यात झाली. रुग्णांसाठी विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून समाजातील नागरिकांनी, दानशूरांनी हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाची माहिती अमेरिकेत नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले त्यांचे मित्र तथा बुलडाणा येथील रहिवासी आनंद बाबूराव जाधव यांना मिळाली. त्यांनी तुपकरांशी संपर्क साधून आपल्या जिल्ह्यातील, गावातील रुग्णांसाठी काहीतरी करण्याची तयारी दाखवीत आयसोलेशन सेंटरच्या या उपक्रमाला हातभार लावण्याची तयारी दर्शविली आणि दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची भेट दिली. २८ मे रोजी हे कॉन्सन्ट्रेटर किन्होळा आयसोलेशन सेंटर येथे बसविण्यात आले. किन्होळा गावातील रुग्णांना येथे आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, आता ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध झाल्याने आयसोलेशन सेंटर नव्हे, तर कोविड हॉस्पिटल निर्माण झाले आहे. त्यामुळे येथे आता किन्होळ्यासह परिसरातील रुग्णांनादेखील भरती करून घेतले जाईल, अशी माहिती रविकांत तुपकर यांनी दिली. आनंद जाधव यांचे बंधू सचिन जाधव, प्रभाकर बाहेकर, प्रा. जगदेवराव बाहेकर, पोलीस पाटील नंदकिशोर बाहेकर, राजू बाहेकर यांच्या हस्ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले. यावेळी प्रा. जगदेवराव बाहेरकर यांनी ११ हजार रुपयांची मदत दिली. डॉ. अनिल साळोख, डॉ. योगेश परिहार यांच्यासह स्वयंसेवक उपस्थित होते.
११ रुग्णांना मिळाली सुटी!
किन्होळा येथील आयसोलेशन केंद्रामध्ये भरती असलेले अनेक रुग्ण आजपर्यंत ठणठणीत बरे झाले आहेत. शनिवारी आणखी ११ रुग्ण बरे झाल्याने त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करीत सुटी देण्यात आली. यावेळी तुपकरांसह डॉ. योगेश परिहार, डॉ. अनिल साळोख, वसंत जाधव व स्वयंसेवक उपस्थित होते.