वाटमारी करणारे दोन जण गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:17 AM2017-09-11T01:17:23+5:302017-09-11T01:17:50+5:30
येथून तेल्हारा येथे जात असलेल्या इसमाचा पाठलाग करून हातणी ते केळवददरम्यान त्यांची मोटारसायकल अडवून मोबाइल व नगदी रकमेची लुबाडणूक करणार्या दोन जणांना शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने अवघ्या काही तासांत १0 सप्टेंबर रोजी जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : येथून तेल्हारा येथे जात असलेल्या इसमाचा पाठलाग करून हातणी ते केळवददरम्यान त्यांची मोटारसायकल अडवून मोबाइल व नगदी रकमेची लुबाडणूक करणार्या दोन जणांना शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने अवघ्या काही तासांत १0 सप्टेंबर रोजी जेरबंद केले.
तेल्हारा येथील अनंता पुंडलिक पानझोडे (वय २६) हे तेल्हारा येथे आपल्या गावी जात असताना दोन जणांनी त्यांच्या काळ्या रंगाच्या पल्सर गाडीने पाठलाग केला व हा तणी ते केळवद रोडवर पल्सरवरील आरोपींनी अनंता पानझोडे यांची दुचाकी अडवली व जबरदस्तीने त्यांच्या ताब्यातील नगदी १५ हजार रुपये व एक मोबाइल अंदाजे किंमत पाच हजार रुपये असा एकूण २0 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. फिर्यादी अनंता पुंडलिक पानझोडे यांनी सदर प्रकरणाची फिर्याद चिखली पोलीस स्टेशनला नोंदवली असता आरोपीच्याविरोधात भादंवि कलम ३९२, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपींच्या शोधासाठी सर्व पोलीस स्थानकांना वायरलेस देण्यात आला. बुलडाणा पोलिसांना संदेश प्राप्त होताच जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीणा, अपर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी बिबी महामुनी तथा ठाणेदार सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाच्या पथकाने वर्णनावरून आरोपीचा शोध सुरू केला असता अक्षय ऊर्फ पाप्या आनंदा उघडे (वय २८) वॉर्ड नं.१ भंगी पुरा व सुनील ऊर्फ लेमन संजय काळे (वय २२) वॉर्ड नं.२ भीमनगर हे दोघे बुलडाणा शहरात फिरत असताना त्यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनला आणण्यात आले.
त्यांची चौकशी केली असता सुरुवातीला दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला असून, त्यांच्या ताब्या तून गुन्ह्यात वापरलेली विनानंबरची काळी बजाज पल्सर, फिर्यादीचा मोबाइल जप्त करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.