सात तासांपासून ते दोघे विहिरीत अडकले; प्रशासनाकडून मदत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 09:12 PM2019-04-05T21:12:41+5:302019-04-05T21:12:53+5:30
आपत्कालीन पथक घटनास्थळी न पोहोचल्यानं संताप
बुलडाणा : अंगणातील विहिरीत खोदकामासाठी उतरलेले दोघे गेल्या सात तासापासून विहिरीत अडकून पडल्याची घटना जामोद येथे शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता घडली. प्रशासनाला माहिती देऊन सात तास झाले, तरी अद्याप आपत्कालीन पथक अद्याप दाखल झाले नाही. त्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत.
जामोद येथे वाघमारे यांच्या घरासमोरील विहिरीचे खोदकाम सुरु होते. त्यावेळी प्रतीक अभय वाघमारे हा तरुण विहिरीत उतरला. त्याचा जीव गुदमरल्याने त्याने आवाज दिला. तेव्हा त्याचे काका विजय वाघमारे हे विहिरीत उतरले. मात्र दोघेही बाहेर आले नाही. काही वेळाने त्या दोघांना काढण्यासाठी मिलिंद मुरलीधर वाघमारे हे खाली उतरले. त्यांनी प्रतीकला दोराने बांधून वर काढले. त्यानंतर ते विजय वाघमारे यांना काढायला विहिरीत उतरले. मात्र रात्रीचे ८ वाजून गेल्यानंतरही विजय व मिलिंद वाघमारे हे विहिरीतच असल्याचे नागरिकांनी सांगितले. बाहेर निघण्यास त्यांना अडचण जात आहे. या घटनेची माहिती प्रशासनाला दिल्यानंतरही आपत्कालीन पथक पोहोचले नाही. फक्त रुग्णवाहिका दाखल झाली. प्रतीक वाघमारे याच्यावर जळगाव जामोद येथे रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर दुपारी १२.३० वाजेपासून रेस्क्यू टीम पोहचू शकली नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.