बुलडाणा जिल्ह्यातील दोन हजारावर शाळा, महाविद्यालय बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 01:50 PM2019-11-12T13:50:37+5:302019-11-12T13:50:46+5:30
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खबरदारी म्हणून शिक्षण विभागाने हे पाऊल उचलले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : दिवाळीच्या सुट्टीनंतर ७ नोव्हेंबरला जिल्हा परिषद शाळांची पहिली घंटा वाजली. त्यानंतर शनिवारी अयोध्या निकाल जाहीर झाला. या निकालाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने सोमवारी जिल्ह्यातील दोन हजारावर शाळा, महाविद्यालयांना एक दिवस सुट्टी देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खबरदारी म्हणून शिक्षण विभागाने हे पाऊल उचलले आहे.
अयोध्या येथील राम मंदिर व बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल जाहीर होताच शनिवारपासून बुलडाणा जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. शनिवारपासून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस प्रशासनाने जिल्ह्यातील काही संवेदनशील भागात कलम १४४ लागू केले. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात वातावरण शांत असले तरी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी सोमवारी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली. प्रशासनाच्या सुचनेनुसार सोमवारी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आले.
सलग सुट्यांचा शिक्षकांना फायदा
सोमवारी जिल्हा प्रशासनाच्या सुचनेने दिलेल्या सुट्टीमुळे शिक्षकांना सलग सुट्टयांचा मोठा फायदा झाला. यामध्ये अयोध्या निकालाच्या अनुषंगाने १० नोव्हेंबरला सुट्टी आणि ११ नोव्हेंबरला रविवारची सार्वजनिक सुट्टी आली. त्यानंतर १२ नोव्हेंबरला पुन्हा ‘कलेक्टर डिक्लेर’ सुट्टी देण्यात आली. १३ नोव्हेंबर रोजी गुरूनानक जयंतीची सुट्टी आली. त्यामुळे सलग चार दिवस सुट्ट्या शिक्षकांना मिळाल्या आहेत.
सर्व शाळांकडून आदेशाचे पालन
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश आले होते. त्यानुसार सर्व शाळांकडून त्या आदेशाचे पालन करण्यात आले. कुठलाही अनुचित प्रकार घडला नसला तरी, प्राथमिक, माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा होता.
- अमोल तेजनकर, जिल्हाध्यक्ष, राज्य खा. प्रा. शिक्षक संघटना.
सुरक्षेच्या दृष्टीने शाळा बंद
जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना आल्या त्यानुसार सर्व पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी व इतर शिक्षण विभागातील यंत्रणांना कळविण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील शाळांना सोमवारी सुट्टी देण्यात आली.
- इजाजुल खान, शिक्षणाधिकारी.