रान डुक्कर आडवे आल्याने दोन दुचाकींचा अपघात, चार जण जखमी
By निलेश जोशी | Published: December 14, 2023 09:21 PM2023-12-14T21:21:58+5:302023-12-14T21:22:05+5:30
मोताळा आयटीआय नजीकची घटना
बुलढाणा: मोताळा शहरानजीकच्या आयटीआय कॉलेज जवळ रानडुक्कर रस्त्यावर आडवे आल्याने दोन दुचाकींचा विचित्र अपघात होऊन चार जण जखमी झाले आहेत. यातील दोन जण गंभीर जखमी असून एकास छत्रपती संभाजीनगर तर दुसऱ्यास जळगाव खान्देश येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
हा अपघात १४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास बुलढाणा-मोताला मार्गावर घडला.मोताळा तालुक्यातील रोहीणखेड येथील संतोष बोरसे आणि सिंधुबाई बोरसे हे दुचाकीने मलकापूरकडून मोताळ्याकडे येत होते. यावेळी आयटीआय कॉलेज जवळ अचानक रानडुक्कर रस्त्यावर आले. त्याने दुचाकीला धडक दिली. याच वेळी मोताळ्याकडून मलकापूरच्या दिशेने शेख समद शेख आमद आणि शेख जुबेर शेख बाबूलाल (रा. मुक्ताईनगर) हे दुचाकीवर येत होते.
या घटनाक्रात रानडुकराची धडक लागल्यानंतर बोरसे यांची दुचाकी शेथ समद यांच्या दुचाकीवर जाऊन धडकली व हा अपघात होऊन दोन्ही दुचाकीवरील चौघेही जखमी झाले. त्यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयता उपचारासाठी हलविण्यात आले. परंतू संतोष बोरसे आणि शेख समद हे दोघे गंभीर जखमी झाल्याने बोरसे यांना छत्रपती संभाजीनगर आणि शेख समद याला जळगाव खान्देश येथे उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती रुग्णालयातील सुत्रांनी दिली.