बुलडाणा जिल्ह्यात दुरंगी, तिरंगी लढती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 04:53 AM2019-10-13T04:53:13+5:302019-10-13T04:53:27+5:30
डॉ. संजय कुटे आणि डॉ. शशिकांत खेडेकर यांची प्रतिष्ठा पणाला
बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने बुलडाण्याचा अपवाद वगळता अन्य मतदारसंघात दुरंगी आणि तिरंगी लढती बघावयास मिळत आहेत. त्यातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेने युतीच्या गोटात चैतन्य निर्माण केले आहे. त्या तुलनेत आघाडीकडून अद्याप बड्या नेत्याची सभा झालेली नाही.
युतीमध्ये जिल्ह्यात भाजपच्या वाट्याला मलकापूर, जळगाव जामोद, खामगाव आणि चिखली या जागा आल्या असून शिवसेनेला बुलडाणा, मेहकर आणि सिंदखेड राजा या तीन जागा सुटल्या आहेत. आघाडीमध्ये काँग्रेस मलकापूर, जळगाव जामोद, खामगाव, बुलडाणा, चिखली आणि मेहकर हे सहा मतदारसंघ लढवीत असून सिंदखेड राजा हा एकमेव मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे आहे.
जळगाव जामोदमध्ये भाजपचे कॅबीनेट मंत्री डॉ. संजय कुटे विरुद्ध काँग्रेसच्या स्वाती वाकेकर अशी लढत होतेय. मलकापूरमध्ये भाजपचे चैनसुख संचेती आणि काँग्रेसचे राजेश ऐकडे यांच्यात सरळ लढत आहे. बुलडाण्यात काँग्रेस, शिवसेना वंचित बहुजन आघाडी, अपक्षामध्ये चौरंगी लढत आहे. चिखलीत भाजपच्या श्वेता महाले आणि काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांच्या बीग फाईट होत असून सिंदखेड राजात शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात थेट लढत आहे.
मेहकरमध्ये शिवसेनेचे रायमुलकर विरुद्ध काँग्रेसचे अनंत वानखेडे यांच्यात लढत होत आहे. खामगावमध्ये भाजपचे अॅड. आकाश फुंडकर विरुद्ध ज्ञानेश्वर गणेश पाटील यांच्यात लढत असून वंचित बहुजन आघाडीचे शरद वसतकार मतविभाजन करण्यात कितपत यशस्वी ठरतात यावर खामगाव मतदारसंघातील गणित अवलंबून आहे.
प्रचारातील प्रमुख मुद्दे
महायुतीकडून गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांवर भर दिला जात आहे. सिंचन, आरोग्य, खारपाणपट्यतील पाण्याचा प्रश्न, रस्ते विकास हे मुद्दे घेऊन महायुती उमेदवारांसमोर जात आहे.
’ आघाडीकडून शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी द्यावी, बेरोजगारीचा प्रश्न, आर्थिक मंदीमुळे त्याची वाढलेली परिणामकारकता याचे वास्तव दर्शविण्याचा प्रयत्न होत आहे. यासोबतच मेहकर, लोणारसह लगतच्या तालुक्यातून होणारे मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठीही उपाययोजनांवर भर देण्याचे आश्वासन आघाडीतर्फे दिल्या जात आहे. मेहकरमधील एमआयडीसीचा मुद्दाही निवडणुकीच्या काळात चर्चेत आला आहे.
’ सिंदखेड राजात २० विरुद्ध पाच वर्षात झालेल्या विकास कामांचीच चर्चा होत आहे. आघाडी विरुद्ध महायुतीमधील घटकांकडून जाहीर प्रचार सभांमधून याच मुद्द्यांवर काथ्याकूट केला जात आहे.
’ खारपाणपट्यातील आरोग्याची समस्या गंभीर असून येथे डायलिसीस युनीट उभारण्यात आल्याचा मुद्दा प्रचारात आहे. सोबतच जळगाव जामोद शहरातील सांस्कृतिक भवनाच्या मुद्द्यासह रस्ते विकास हे मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात प्रामुख्याने आहेत.
रंगतदार लढती
भाजपच्या श्वेता महाले आणि काँग्रेसचे राहूल बोंद्रे यांच्यात चिखलीमध्ये काट्याची लढत होत आहे. जिल्ह्यातील ही एक महत्त्वाची लढत असून उभय बाजूंचे राजकीय अस्तित्व येथे पणाला लागले आहे. या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सिंदखेड राजातही डॉ. शशिकांत खेडेकर आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात थेट लढत असून डॉ. शिंगणेंचे राजकीय अस्तित्व पणाला लागले आहे तर खेडेकर यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे.
जिल्ह्यात सर्वात कमी ४ उमेदवार असलेल्या जळगाव जामोदमध्ये कामगार मंत्री डॉ. संजय कुटे विरुद्ध काँग्रेसच्या डॉ. स्वाती वाकेकर यांच्यात निवडणूक रिंगणात टक्कर होत आहे. जिल्ह्यातील ही एक रंगतदार लढत असून या लढतीचा निकाल कोणाच्या
बाजूने लागतो याबाबत उत्सुकता आहे.