दोनच वर्षात झाली रस्त्याची चाळणी
By admin | Published: July 20, 2014 11:37 PM2014-07-20T23:37:30+5:302014-07-21T00:02:02+5:30
२५ लाखाचा रस्त्यावर खर्च : पावसाने केले पितळ उघडे
लोणार : जिल्हा नियोजन विकास निधी अंतर्गत २0१२-१३ मध्ये झालेल्या शहरातील हिरडव चौक ते फौजदारी न्यायालयाच्या पुलापर्यंतच्या डांबरी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने, दोनच वर्षात या रस्त्याची चाळणी झाली. रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते.
जिल्हा नियोजन विकास निधीतून २५ लाख रुपये खर्च करुन सार्वजनीक बांधकाम विभागाने हिरडव चौक ते दिवाणी फौजदारी न्यायालयाच्या पुलापर्यंंत १३00 मिटर लांबिचे डांबरी रस्त्याचे काम केले. परंतू, सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने, दोनच वर्षात रस्त्याची किनार तुटून रुंदीकरण कमी झाले आहे. तर रस्त्याच्या बाजूला नाल्या न काढल्याने रस्त्यावर जागोजागी पाण्याचे डबके साचले आहेत. या रस्त्यावर कृषि उत्पन्न बाजार समिती आणि दिवाणी फौजदारी न्यायालय असल्याने वाहानांची मोठी वर्दळ असते. सदर रस्त्याचे कामच निकृष्ट दर्जाचे झाल्याने पावसामुळे रस्त्यावर मोठ - मोठे खड्डे पडले आहेत. नुकत्याच झालेल्या पावसाने या कामाचे पितळ उघडे पाडले आहे. काम झाल्या पासून तीन वर्षापर्यंत रस्त्याच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी ही ठेकेदाराची असते. परंतू, रस्त्यावर पडलेल्या खड्डं्याकडे पुर्णपणे दर्लक्ष केले जात असून, अल्प प्रमाणात झालेल्या पावसातही रस्त्यावर पाण्याचे डबके साचत आहेत. याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.