दोन युवकांचा टॉवरवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:34 AM2021-04-11T04:34:08+5:302021-04-11T04:34:08+5:30
तालुक्यात पिंपळगाव सराई येथील सैलानी बाबा यांचा दरवर्षी यात्रा उत्सवानिमित्त संदल काढला जातो. परंतु, मागील वर्षी व याही वर्षी ...
तालुक्यात पिंपळगाव सराई येथील सैलानी बाबा यांचा दरवर्षी यात्रा उत्सवानिमित्त संदल काढला जातो. परंतु, मागील वर्षी व याही वर्षी कोरोना संसर्गामुळे ही यात्रा जिल्हा प्रशासनाने स्थगित केली होती. दरम्यान, २ एप्रिल रोजी मुजावर परिवारातील मोजक्या लोकांनी नियमाप्रमाणे आपली परंपरा कायम ठेवत जीपमध्ये संदल काढला होता. सैलानी बाबाच्या दरगाहवर भाविकांची गर्दी जमली होती. जमलेल्या भाविकांच्या गर्दीला कारणीभूत ठरवून सैलानी येथील मुजावर परिवाराला जबाबदार ठरवत पोलिसांनी मुजावर परिवारातील १० जणांवर विविध कलमान्वये रायपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. सैलानी येथे भाविक दाखल होेणे, हे प्रशासनाचे अपयश आहे. त्यामुळे गुन्हेगाराला सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करून मुजावर परिवारावर दाखल गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी बुलडाणा येथील सुरेश पाटील ऊर्फ माऊली व शेख नफीस शेख हफिज यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ६ एप्रिल रोजी निवेदन दिले होते. त्यानुसार त्यांच्या मागणीची कोणतीही दखल न घेतल्याने सुरेश पाटील ऊर्फ माऊली व शेख नफीस शेख हफिज हे दोघे १० एप्रिल रोजी सकाळी बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराईजवळच्या एका मोबाइल टॉवरवर चढले. यावेळी त्यांनी सोबत पेट्रोलही नेले होते. टॉवरवर चढून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांना आत्महत्या करण्यास थांबवून खाली उतरवले व आपल्या ताब्यात घेऊन ठाण्यात नेण्यात आले आहे. पुढील कारवाई पोलीस करीत आहे.