खामगाव: अनधिकृत स्थलांतरीत शाळा जैसे थे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 03:45 PM2019-11-09T15:45:43+5:302019-11-09T15:46:02+5:30
शिक्षण विभागाच्या चौकशीनंतरही संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने ही शाळा हलविली नसल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: स्थलांतरासाठी शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता तब्बल अडीच महिन्यांपासून खामगाव शहरात इंग्रजी माध्यमाची एक अनधिकृत शाळा चालविण्यात येत आहे. शिक्षण विभागाच्या चौकशीनंतरही संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने ही शाळा हलविली नसल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले. दीपावलीच्या सुटीनंतर पुन्हा ही शाळा भाड्याच्या जागेतच सुरू होती.
शहरातील टिचर कॉलनीत १ सप्टेंबर २०१९ पासून मांऊट सिनाई ही शाळा अनधिकृतपणे चालविली जात असल्याची तक्रार शहर पोलिसात झाली होती. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडेही अनुषंगीक तक्रार झाली होती. खामगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी २३ सप्टेंबर रोजी पाहणी केली. शाळेच्या भेटीच्या दिवशी इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत पटावरील १६३ पैकी १४१ विद्यार्थी हजर होते. दरम्यान, शाळेला मान्यता मिळालेल्या ठिकाणाऐवजी शहरात अनधिकृतपणे ही शाळा चालविली जात होती. तसा अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे.
शिक्षण विभागाच्या तपासणीनंतरही शाळा भाड्याच्याच खोलीत!
मांऊट सिनाई ही इंग्रजी माध्यमाची शाळा चक्क एका भाड्याच्या इमारतीत सुरू असल्याच्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाकडून या शाळेची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान, केवळ आठ-दहा दिवसांसाठी ही शाळा तात्पुरत्या स्वरूपात हलविण्यात आल्याचे संबंधितांनी नमूद केले. मात्र, त्यानंतर दीपावलीच्या सुटी लागल्या. या सुटीनंतरही ही शाळा भाड्याच्याच इमारतीत सुरू असल्याचे गुरूवारी दिसून आले.
टिचर कॉलनीतील एका इमारतीत मांऊट सिनाई ही शाळा अनधिकृतपणे चालविण्यात येत आहे. शिक्षण विभागाकडून या शाळेची चौकशी करण्यात आली आहे. दीपावलीच्या सुटीत बंद असलेली ही शाळा आता पुन्हा त्याच इमारतीत सुरू झाली आहे.
- मो. इमरान मो. इकबाल
तक्रारकर्ते, टिचर कॉलनी
मान्यता असलेल्या ठिकाणी शाळा सुरू नाही. दोन सदस्यीय समितीमार्फत या शाळेची चौकशी करण्यात आली. शिक्षण विभागाची परवानगी न घेताच, ही शाळा इतरत्र स्थलांतरीत करण्यात आली आहे. या शाळेला शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग, अमरावती यांच्याकडून परवनागीचे आदेश प्राप्त नाहीत.
- गजानन गायकवाड गटशिक्षणाधिकारी,
पंचायत समिती, खामगाव.