बुलडाणा जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांवर अनिश्चिततेच सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 11:35 AM2021-03-04T11:35:52+5:302021-03-04T11:36:10+5:30
market committee elections in Buldana district कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्या व सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांवर अनिश्चिततेचे सावट आहे.
- विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील १३ पैकी १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुदत संपली असून, कोरोनामुळे निवडणुका न होता प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आणखी कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्या व सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांवर अनिश्चिततेचे सावट आहे.
जिल्ह्यात शेगाव वगळता बारा कृषी उत्पन्न बाजार समित्या व सेवा सहकारी सोसायट्यांची मुदत संपली आहे. कोरोनामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणाने बाजार समित्यांच्या निवडणुुकांना स्थगिती दिली आहे. कोरोनाचे रूग्ण कमी होत असल्याने लॉकडाऊन शिथील करण्यात आला होता.
अनेक व्यवसाय सुरू झाले होते. ग्रामपंचायतीच्याही निवडणुका पार पडल्या. त्यामुळे आता बाजार समित्यांच्या निवडणुका पार पडतील, अशी अपेक्षा होती. राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणानने कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका ३१ मार्चनंतर घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने याबाबत पुन्हा अनिश्चितत निर्माण झाली आहे. त्यामुळे ३१ मार्चनंतर बाजार समित्या व सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका होतील की आणखी पुढे ढकलाव्या लागतील, याबाबत स्पष्टपणे सांगता येणार नाही.
प्रशासकांची मुदत वाढविणार
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुदत संपल्याने प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. प्रशासकाचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असतो.
मात्र काही बाजार समित्यांमध्ये प्रशासकांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात येणार आहे.
शेगाव वगळता जिल्ह्यातील २१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुदत संपली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आगामी काळात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली तर पुढील आदेशानुसार निर्णय घेण्यात येणार आहे.
- महेंद्र चव्हाण,
जिल्हा उपनिबंधक, बुलडाणा