गावात पसरली अस्वच्छता, चिखलात बसून केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:37 AM2021-09-18T04:37:55+5:302021-09-18T04:37:55+5:30
गावातील अनेक भागांतील नाल्या घाणीने तुडुंब भरलेल्या असून, ते घाण पाणी रस्त्यावर वाहताना बघावयास मिळते. काही वार्डात कचरा अस्ताव्यस्त ...
गावातील अनेक भागांतील नाल्या घाणीने तुडुंब भरलेल्या असून, ते घाण पाणी रस्त्यावर वाहताना बघावयास मिळते. काही वार्डात कचरा अस्ताव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण देण्याचे काम करीत आहे. गाव स्वच्छतेवर भर असल्याची ओरड करत, स्थानिक गावकऱ्यांनी वारंवार ग्रामसेविकेला विनवणी केली असता, या विनंतीला त्यांनी केराची टोपली दाखविली आहे. वाकी गावामध्ये येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत गटार घाणीने होते व याच ठिकाणाहून गावाला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन गेलेली आहे. त्या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी वॉल आहेत. त्यामध्ये पाणी लीक होते आणि तेच पाणी गावाला पिण्यासाठी सोडले जाते. हे पाणी दूषित असल्यामुळे गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. सध्या मोठ्या प्रमाणात साथरोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यात ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने नागरिकांना मूलभूत सोईसुविधा पुरवणे गरजेचे असताना, ग्रामपंचायत व ग्रामसेवकांच्या उदासीन धोरणामुळे गावकऱ्यांना वेठीस त्यांच्या जीवाशी खेळ होत आहे. ग्रामपंचायतील स्वच्छतेसाठी निधी तर मिळतो. मात्र, तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो, हे गावातील अस्वच्छतेवरून स्पष्ट होते. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या प्रकरणी संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी यावेळी गावकरी करत आहे.
आंदोलनाचा इशारा
गावाच्या स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अकार्यक्षम प्रशासनाविरोधात ग्रामस्थांच्या भावना तीव्र बनल्या आहेत. वेळीच ग्रामपंचायतीने स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक रहिवासींनी दिला आहे.