दिव्यांग कर्मचाऱ्यांना मागितले लाभ न घेण्याचे हमीपत्र!
By admin | Published: May 25, 2017 12:54 AM2017-05-25T00:54:34+5:302017-05-25T00:54:34+5:30
चिखलीमधील ४०, बुलडाण्यातील चार जणांचा समावेश!
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शासनाच्यावतीने दिव्यांगांना दिला जाणारा कोणताही लाभ घेणार नाही, असे हमीपत्र लिहून देण्याचा आदेश जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विविध विभागांना दिला आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी सदर आदेश आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना दिला. जिल्हाभरात शिक्षकांसह कर्मचारी आम्ही दिव्यंगत्वाचा कोणताही लाभ घेणार नाही, असे हमीपत्र लिहून देत आहेत. चिखली तालुक्यात ४० जणांनी, तर बुलडाणा तालुक्यात चार जणांनी आम्ही दिव्यांग असल्याचा कोणताही लाभ घेणार नाही, असे हमीपत्र लिहून दिले आहे. तसेच यामध्ये तालुक्या-तालुक्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता बोगस दिव्यांग प्रमाणपत्र अनेक कर्मचाऱ्यांनी मिळविले आहेत. गत काही वर्षांपासून या प्रमाणपत्रांचा लाभ घेण्यात येत आहे. यामुळे खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होत आहे. तसेच दिव्यांगाचे प्रमाणपत्र न मिळविलेल्या कर्मचाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. बोगस प्रमाणपत्र घेऊन अनेक कर्मचारी दहा ते बारा वर्षांपासून एकाच ठिकाणी आहेत. दिव्यांग असल्यामुळे त्यांची बदली होत नाही. त्यामुळे ज्यांनी हे प्रमाणपत्र घेतले नाही, अशा कर्मचाऱ्यांच्या ग्रामीण भागात बदल्या होत आहेत. यापूर्वी कर्मचाऱ्यांनी अनेकदा याबाबत तक्रारी केल्या मात्र, त्यांची दखल घेण्यात आली नाही. याबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिव्यांग प्रमाणपत्रावर आधारित सर्व शासकीय लाभ /सवलती ज्याप्रमाणे वाहन भत्ता, व्यवसाय कर, आयकर बदली, पदोन्नती ई. बाबीचा लाभ घ्यावयाचा नसल्यास तसे लेखी हमीपत्र कार्यालयात सादर करण्याचा आदेश दिला. कर्मचाऱ्यांनी लाभ न घेण्याविषयीचे हमीपत्र सादर केल्यास तशी नोंद सेवापुस्तकात घेण्यात येईल व यापूर्वी घेतलेल्या सवलती/लाभ याबाबत कोणतीही कार्यवाही होणार नाही, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. तथापि उपरोक्त लाभ/सवलतींचा लाभ घ्यावयाचा असल्यास आपण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना स्वतंत्र अर्ज करावा, असेही बजावण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या अर्जाला मुकाअ यांची मान्यता मिळाल्यानंतरच उपरोक्त लाभ देण्यात येणार आहे.
आणखी वाढ होणार!
जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील उच्चश्रेणी मुख्याध्यापक, शिक्षक, पदवीधर शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना दिव्यांग नसतानाही प्रमाणपत्र मिळविले असेल, तर त्याचा कोणताही लाभ घेणार नाही, असे हमीपत्र लिहून देण्याचे सांगितले आहे. त्यानुसार जिल्हाभरात शिक्षक आम्ही लाभ घेणार नाही, असे लिहून देत आहेत. चिखली पंचायत समितीतील आतापर्यंत ४० शिक्षकांनी, तर बुलडाणा तालुक्यातील चार शिक्षकांनी आम्ही दिव्यांगत्वाचा लाभ घेणार नाही, असे लिहून दिले आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.