रेतीची वाहतूक करणा-या युवकांवर बेरोजगारीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:15 AM2018-03-10T01:15:53+5:302018-03-10T01:15:53+5:30
मलकापूर( बुलडाणा) : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे रेती वाहतूक करणा-या बेरोजगार युवकांवर उपासमारीची पाळी आली असून, यासह तालुक्यातील विविध विकास कामांना व खासगी बांधकामांना खीळ बसल्याने अनेकांचा रोजगारही डुबत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर( बुलडाणा) : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे रेती वाहतूक करणा-या बेरोजगार युवकांवर उपासमारीची पाळी आली असून, यासह तालुक्यातील विविध विकास कामांना व खासगी बांधकामांना खीळ बसल्याने अनेकांचा रोजगारही डुबत आहे. या सर्व बाबींचा गांभिर्याने विचार करत शासनाने तत्काळ मलकापूर तालुका व परिसरातील रेती घाटांची हर्रासी करावी, रॉयल्टीचे दर कमी करण्यात यावे, अन्यथा त्या बेरोजगार युवकांना शासनाने पर्यायी रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा आग्रही मागणीसाठी शहर शिवसेना व रेती वाहतूकदार संघटनेच्यावतीने शिवसेना शहर प्रमुख किशोर नवले, माजी तालुका प्रमुख अरूण अग्रवाल यांच्या नेतृत्वात आज ५ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. अनेक तरूणांच्या वाहनांवर कर्जे असल्याने ते दुहेरी संकटात सापडले आहेत. यामुळे शासनाने या सर्व बाबींचा तत्काळ गांभिर्याने विचार करावा व रेती घाटांची हर्राशी करून रॉयल्टीचे दर कमी करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख किशोर नवले, माजी तालुका प्रमुख अरूण अग्रवाल, मलकापूर ग्रामीणचे सरपंच उमेश राऊत, राजू फुलोरकर, मुकेश लालवाणी, एकनाथ डवले, उमेश हिरूळकर, युवा सेना जिल्हा उपप्रमुख अमोल टप, शहर प्रमुख योगेश ढगे, गौरव वानखेडे, वेदांत ढकळे, संतोष कोल्हे, रेती वाहतूकदार संघटनेचे श्रीकृष्ण भगत, अरूण किनगे, प्रशांत अढाव, दिलीप देशमुख, आलीक जवारीवाले, सौरभ पाटील, मंगेश पाटील, राजू सावरकर, विजय गावंडे, सागर बेलोकार, संजय बावस्कार आदी उपस्थित होते.
हप्ते भरण्याचीही सोय नाही
स्वयंरोजगारासाठी कष्टकरू तरूणांनी रेती वाहतुकीची वाहने घेऊन आपला रोजगार सुरू केला होता; मात्र शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे त्या तरूणांवर आता उपासमारीची पाळी आली आहे.