जिल्ह्यात आगामी चार दिवस सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:23 AM2021-06-10T04:23:28+5:302021-06-10T04:23:28+5:30
या पावसामुळे शेतकऱ्यांनी आता पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपती घेतली असून बी-बियाणे खरेदीसह पेरणीची पूर्वतयारी केली आहे. मात्र अद्यापही पेरणीयोग्य ...
या पावसामुळे शेतकऱ्यांनी आता पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपती घेतली असून बी-बियाणे खरेदीसह पेरणीची पूर्वतयारी केली आहे. मात्र अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर्तास पेरणी करणे टाळावे, असे जिल्हा हवामान केंद्राने म्हटले आहे.
दरम्यान, मुंबईत मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पुढील तीन दिवसांत विदर्भ व्यापण्यास मान्सूनला वेळ लागतो. त्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात १० जून ते १३ जूनदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केला आहे. हा पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने पेरणी करावी की नाही, याचा निर्णय घेता येईल, असे कृषी हवामानतज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात या वर्षी सात लाख ३८ हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे.
पेरणी केव्हा करावी?
साधारणत: ७५ मि. मी. ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर जमिनीमध्ये एक ते दीड फुटापर्यंत ओल येेते. ती आल्यासच शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचा निर्णय घ्यावा. या ओलाव्यातच बी रुजू शकते. अन्यथा जमिनीत टाकलेले बी सडण्याची शक्यता असते. तसे झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा फटका बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत पडलेल्या पावसाच्या भरोशावर पेरणी करणे टाळावे, असे यदुलवार यांनी सांगितले.