जिल्ह्यात बायो डिझेलची विनापरवाना विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:37 AM2021-08-27T04:37:17+5:302021-08-27T04:37:17+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता जैविक इंधन (बायो डिझेल)ची सर्रास विक्री सुरू आहे. जागो-जागी केंद्र उभारून ...
बुलडाणा : जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता जैविक इंधन (बायो डिझेल)ची सर्रास विक्री सुरू आहे. जागो-जागी केंद्र उभारून जैविक इंधन विक्रीचा मोठा गोरखधंदा फोफावला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील अवैध जैविक इंधन विक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी १० ऑगस्ट रोजी दिले आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर चारचाकी वाहनांमध्ये लागणारे जैविक इंधन विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या विक्री केंद्रामार्फत जैविक इंधनाची विक्री करण्यात येत आहे. या जैविक इंधनाची ज्वलनशीलता कमी असल्याने त्याचा वाहनांवर विपरीत परिणाम होतो. असे जरी असले तरी या इंधनाची विक्री करण्याकरिता आवश्यक असलेली परवानगी जिल्ह्यात एकाही जैविक इंधन विक्री केंद्राने घेतली नसल्याचे चित्र आहे. यामुळे या विक्री केंद्राचा मोठ्या प्रमाणात गोरखधंदा सुरू असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे. हा प्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी १० ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील अशा जैविक इंधन विक्री केंद्रावर कारवाई करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
-- दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर एक केंद्र--
जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर एक जैविक इंधन विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राची संख्या जिल्ह्यात शेकडोच्या घरात असून, केंद्रातून दररोज मोठ्या प्रमाणावर जैविक इंंधन विक्री होत आहे. मात्र, ही विक्री विनापरवाना असून, या अवैध विक्री केंद्राचा गोरखधंदा रोखण्याचे जिल्हा प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे. प्रशासनाकडेही जिल्ह्यात नेमकी अशी किती केंद्रे आहेत याची माहिती उपलब्ध नाही.
--कारवाईसाठी पथके स्थापन--
अवैध जैविक इंधन विक्री केंद्रावर कारवाई करण्यासाठी सहा पथके स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये एक उपविभागीय अधिकारी, विक्री अधिकारी, नायब तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक आणि एक निरीक्षक वैद्यमापन शास्त्र अधिकारी अशा अधिकाऱ्यांचे सहा पथके जिल्ह्यात स्थापन करण्यात आली आहेत. मात्र, अद्याप एकाही अशा केंद्रावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे केवळ पथके नियुक्त करण्याचा सोपस्कार झाला असल्याचे चित्र आहे.
- जैविक इंधनाचे नमुने तपासले जाणार-
जिल्ह्यातील जैविक इंधन व औद्योगिक तेल विक्री केंद्रातून भेसळयुक्त इंधन आणि तेलाचे नमुने घेण्यात येणार आहेत. घेण्यात आलेले नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून मिळाली आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात गुजरात राज्यातून हे जैविक इंधन येत असल्याची चर्चा आहे.