Unlock Buldhana : मॉल, थिएटर्स व नाट्यगृह सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 12:20 PM2021-06-13T12:20:34+5:302021-06-13T12:20:40+5:30
Unlock Buldhana : जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी ६ जून रोजी दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्यात ४ जून रोजी निर्गमित करण्यात आलेल्या सुधारित आदेशानुसार बुलडाणा जिल्हा आता पहिल्या श्रेणीमध्ये समाविष्ट झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी ६ जून रोजी दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात लागू असलेल्या बाबींना १४ जून रोजी सकाळी ७ वाजेपासून ते पुढील आदेशापर्यंत मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे मॉल, थिएटर्स, नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी राहणार आहे.
या आदेशानुसार सर्व अत्यावश्यक सेवेची व अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने नियमित सुरू राहतील. मॉल, थिएटर्स व नाट्यगृह एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. ज्या खुर्च्यांचा वापर करण्यात येणार नाही, त्या खुर्च्यांवर सेलोटेप, रिबन व स्टिकर लावून त्या वापरात नाही असे दर्शवावे लागणार आहे. कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने, कृषी प्रक्रिया, उद्योग गृहे, शेती अवजारे व शेतातील उत्पादनाशी निगडीत दुकाने नियमित सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे हॉटेल्स, रेस्टॉरंट व खानावळ नियमितपणे सुरू राहतील. रेस्टॉरंट मध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी हॉटेल मालकाने घ्यावी. आसने शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करून असावी. सार्वजनिक ठिकाणे, खुले मैदान, फिरणे व सायकलिंगसाठी परवानगी आहे. क्रीडा स्पर्धा नियमित होतील. एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. सर्व केशकर्तनालये, सलून, स्पा, ब्युटी पार्लर नियमित सुरू राहतील. खुर्ची व वापरण्यात येणारे साहित्य निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल. आंतर जिल्हा व जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतूक सुरू राहील. मात्र, रेड झोन मधील जिल्ह्यात जाणे-येणे होत असल्यास ई-पास आवश्यक राहील.
दरम्यान नागरिकांनी त्रिसुचीचे पालन करणे गरजेचे आहे.