जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीचा ५७ गावांना फटका; दीड हजार हेक्टरवर नुकसान
By ब्रह्मानंद जाधव | Published: April 28, 2023 01:22 PM2023-04-28T13:22:09+5:302023-04-28T13:22:25+5:30
कांदा, भाजीपाला पिकांसह फळबागांवर संकट
बुलढाणा : जिल्ह्यात दोन दिवसात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे दीड हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या अवकाळीचा ५७ गावांना फटका बसला आहे. यामध्ये कांदा उन्हाळी, मूग, भूईमूंग, भाजीपाला पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसत आहे.
दिवसभर उन्हाचा कडाक आणि सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. बुलढाणा, चिखली, मेहकर, मोताळा, मलकापूर, खामगाव, शेगाव, नांदुरा या तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तर काही ठिकाणी गारपिटीने झोडपले. सध्या शेतात भाजीपाला वर्गीय पिकांसह कांदा, बिजोत्पादनाचा कांदा, उन्हाळी मूग, भूईमूंग व फळबाग आहेत. या पिकांचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आलेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. काही भागात मका पिकही भूईसपाट झाले आहे.
असे झाले नुकसान
जिल्ह्यात २५ व २६ एप्रिल रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १ हजार ३२९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. चिखली तालुक्यात ९१.८० हेक्टर क्षेत्रावरील कांदा उन्हाळी मुग, भुईमूग, भाजीपाला, टरबूज, खरबूज या पिकांचे नुकसान झाले आहे. मोताळा तालुक्यात २९७ हेक्टर क्षेत्रावरील मका, कांदा व फळबागांचे नुकसान झाले. मलकापूर तालुक्यात ०.८० हेक्टर क्षेत्रावरील मका, कांदा खामगाव तालुक्यातील कांदा, उन्हाळी मुंग, भूईमूग, भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकांना फटका बसला. शेगाव तालुक्यात ०.६० हेक्टरील फळबागा आणि नांदुरा तालुक्यात २ हेक्टर क्षेत्रावरील उन्हाळी ज्वारीचे नुकसान झाले.
कोणत्या तालुक्यातील किती गावांचे नुकसान
तालुका गावे
चिखली : ०८
मोताळा : १६
मलकापूर : ०१
खामगाव : ३०
शेगाव : ०१
नांदुरा : ०१