बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; नदी, नाल्यांना पूर
By विवेक चांदुरकर | Published: November 27, 2023 03:37 PM2023-11-27T15:37:34+5:302023-11-27T15:40:26+5:30
खामगावात १४ तास वीजपुरवठा खंडीत
विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव (जि. बुलढाणा) : जिल्ह्यात २६ नोव्हेंबर रोजी रात्री जोरदार अवकाळी पाऊस बरसला. खामगाव शहरात रात्रभरात ४४ मिमी पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. तसेच खरीप हंगामातील कपाशी पिकाचे नुकसान होणार आहे. खामगाव शहरातील काही भागात १४ तास वीज पुरवठा खंडीत झाला आहे.
जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यात अल्प पाऊस झाला. पावसाळ्यात पावसाचे दोन मोठे खंड पडले. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले तसेच धरणांमध्येही अल्प जलसाठा आहे. रब्बी हंगामातील पिकांना पावसाची निंतात गरज होती. अवकाळी पावसाने पिकांना फायदा होणार आहे. रविवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान पावसाला सुरूवात झाली. रात्रभर जोरदार पाऊस कोसळला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. खामगाव येथे ४४ मिमी पाऊस झाला. तालुक्यात यावर्षी ६४४ मिमी. पाऊस झाला आहे. तालुक्यातील काही भागात शेतांमध्ये पाणी साचले आहे. हवामान खात्याने २७ नोव्हेंबर रोजी पाऊस व गारपीटीची शक्यता वर्तविली आहे.