अवकाळी पावसाचा पिकांना फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:33 AM2021-03-21T04:33:43+5:302021-03-21T04:33:43+5:30
गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत घोंघावत असलेल्या आभाळाने गुरुवारी कमी प्रमाणात तर शुक्रवारी मेघगर्जनेसह तालुक्यातील काही भागांत गारपीट ...
गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत घोंघावत असलेल्या आभाळाने गुरुवारी कमी प्रमाणात तर शुक्रवारी मेघगर्जनेसह तालुक्यातील काही भागांत गारपीट झाली. यामध्ये मेहकर तालुक्यातील ३७ गावे बाधित झाली असून, यामध्ये मेहकर मंडळातील १२, डोणगाव मंडळातील २०, जानेफळ मंडळातील ५ गावांचा समावेश आहे. शुक्रवारी झालेल्या वादळी पावसात व गारपिटीमध्ये गहू, ज्वारी, मका, हरभरा, उन्हाळी मूग, भुईमूग, खाण्याचा कांदा, बियाण्याचा कांदा, भाजीपाला, पपई या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याकरिता तहसीलदार यांच्या सूचनेवरून महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्राथमिक नुकसानीचा अहवाल सादर करण्याकरिता शनिवारी तालुक्यात फिरून झालेल्या नुकसानाची पाहणी केली. मेहकर मंडळ १२, डोणगाव मंडळ २०, जानेफळ मंडळ येथील पाच गावे बाधित झाली आहेत. एकूण १ हजार १५९ हेक्टर क्षेत्रावर १ हजार ९५६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
असे झाले नुकसान
पीक क्षेत्र हेक्टरमध्ये बाधित शेतकरी
गहू १४७ २८७
ज्वारी ४४ ८९
मका १६ ३९
हरबरा ३६ ७६,
मूग ५८ ९४
भुईमूग ३६ ८१
खाण्याचा कांदा ४५ ९३
बियाण्याचा कांदा ५९२ ७०५
भाजीपाला १२० २१६
पपई ४५ ९०
फळपिके क्षेत्र ४९ ७७
गारपीट व वादळामुळे शेतमालाचे नुकसान झाल्याच्या माहितीवरून प्राथमिक नुकसानीचा अहवाल मागविला आहे. या अहवालावरून पुढील पंचनाम्याचे आदेश काढण्यात येतील.
- डाॅ. संजय गरकल, तहसीलदार, मेहकर.