५९ हजार सातबारे ‘अपडेट’; तांत्रिक दोषही झाले दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:32 AM2017-11-14T00:32:47+5:302017-11-14T00:34:29+5:30
ई-डिस्टीक आणि ई-ऑफिस संकल्पनेच्या दिशेने बुलडाणा जिल्ह्याने वाटचाल सुरू केली असून ई-म्युटेशन कार्यक्रमातंर्गंत मालमत्तांपैकी बहुतांश मालमत्तांचे सातबारे आता संगणकीकृत झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ई-डिस्टीक आणि ई-ऑफिस संकल्पनेच्या दिशेने बुलडाणा जिल्ह्याने वाटचाल सुरू केली असून ई-म्युटेशन कार्यक्रमातंर्गंत मालमत्तांपैकी बहुतांश मालमत्तांचे सातबारे आता संगणकीकृत झाले आहे. जिल्हा मुख्यालय असलेला बुलडाणा तालुका त्या दृष्टीने आघाडीवर असून एकूण ५९ हजार ४२८ सातबारा अपडेट करून १३ तालुक्यातून प्रथम क्रमांकावर आहे.
शेतीचा सातबारा घेण्यासाठी नागरिकांना तहसील कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात. त्यात वेळ पैसा जातो. हे टाळण्यासाठी राज्य शासनाने सातबारा कागदपत्रे संगणीकृत करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या सूचनेनुसार बुलडाणा तालुक्यात ऑनलाईन सातबाराचे काम २0 जुलै २0१५ रोजी सुरू करण्यात आले. यासाठी सातबारा डेटा स्कॅनिंगसाठी प्रशासनाने ई-स्कॅनिंग नावाचे सॉफ्टवेअर तयार केले होते. स्कॅनिंगचे काम निविदेमार्फत एका संस्थेला देण्यात आले आहे. त्यासाठी संस्थेच्या कर्मचार्यांबरोबर महसूल कर्मचार्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले होते. यासाठी तहसीलदार सुरेश बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ मंडळ अधिकारी, ४0 तलाठी यांनी परिश्रम घेवून ३0 सप्टेंबर २0१७ रोजी काम पूर्ण करण्यात आले. यावेळी सातबारा संगणीकरणाचे काम १00 टक्के पूर्ण करून बुलडाणा तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. सातबारा, जन्म-मृत्यू नोंद, पत्रक, कडई पत्रक या कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. जिल्ह्यात ई-फेरफार संकल्पना प्रत्यक्षात उतरण्याच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम समोर येत आहे.
ई-म्युटेशनद्वारे समन्वय
सातबारासह विविध दस्तऐवज ऑनलाईन करण्यासाठी विकसित ई-म्युटेशन कार्यप्रणालीअंतर्गंत ई-महाभूमि, भूमिअभिलेख, ई-मोजणी, ई-चावडी आदी विभागाचा समन्वय साधण्यात आला आहे. कार्यक्रमातंर्गंत दुय्यम निबंधक संबंधित ३५ प्रकारचे कागदपत्रे, सातबार्यावर १ ते ३१ प्रकारच्या अचूक नोंदी करण्यात आल्या आहेत.