पात्र २१ हजार शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 03:32 PM2020-02-05T15:32:57+5:302020-02-05T15:33:30+5:30
२२ फेब्रुवारी पासून बायोमॅट्रीक पद्धतीने आधार पडताळणी होणार आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल कार्यान्वीत होताच पहिल्याच दिवशी बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने तब्बल २१ हजार ३३१ शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याची कमाल केली आहे. जिल्हा बँकेचा आयटी सेल आणि बँकेच्या ५३ शाखांमधील समन्वयामुळे हे शक्य झाल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे राज्यात प्राधान्यक्रमाने अशा पद्धतीने शेतकºयांची कर्जखात्याची माहिती अपलोड करण्यात जिल्हा बँक प्राधान्यक्रमावर असल्याचे चित्र आहे.
जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या २१ हजार ३२५ शेतकºयांना १३२ कोटी ३३ लाख ९७ हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली असून एक फेब्रुवारी रोजी हे पोर्टल सुरू झाल्यानंतर रात्री साडेदहाच्या आत संपूर्ण माहिती अपलोड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा केंद्रीय बँकेचे सीईओ डॉ. अशोक खरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल एक फेब्रुवारी रोजी सुरू झाले. त्यात विहीत नमुन्यात पात्र शेतकºयांची माहिती अपलोड करण्यात येत आहे. ही संपूर्ण योजना ‘आधार’ बेस आहे. त्यामुळे शेतकºयांचे आधार कार्ड क्रमांक मिळविणे हे जिकरीचे काम होते. सोबतच ही माहिती अपलोड करताना त्यात प्रसंगी एखादा डॉट, स्पेस राहल्यास संपूर्ण फाईल रिजेक्ट होण्याचा धोका होता. मात्र त्या संदर्भाने जिल्हा बँकेने ५३ शाखामधील अधिकारी, कर्मचाºयाचंचे प्रशिक्षण घेऊन योजनेच्या अंमलबजावणीची पूर्व तयारी केली होती. त्यामुळे शेतकºयांच्या कर्जखात्याची माहिती ही तांत्रिकदृष्ट्या शुद्ध स्वरुपात बँकेच्या आयटी सेलला मिळाली व उभय विभागाच्या समन्वयाने ही माहिती पोर्टलवर अपलोड करणे शक्य झाले. १५ फेब्रुवारी पर्यंतच ही माहिती अपलोड करता येणार आहे. त्यामुळे आधार क्रमांक नसलेल्या शेतकºयांची अडचण होणार आहे. जिल्हा केंद्रीय बँकेच्या सहा शेतकºयांचे अद्याप आधार क्रमांक मिळालेले नाही. त्यांनाही त्यानुषंगाने व्यक्तीगत स्तरावर जिल्हा बँकेने पत्र देऊन त्यांची माहिती मागवली आहे. दरम्यान, माहिती अपलोड झाल्यानंतर २२ फेब्रुवारी पासून बायोमॅट्रीक पद्धतीने आधार पडताळणी होणार आहे.
पडताळणी होताच कर्जाची रक्कम खात्यात
शेतकºयांची बायामॅट्रीक पद्धतीने आधार पडताळणी होणार आहे. ही पडताळी झाल्यानंतर अर्थात बायोमॅट्रीक आॅथेंटीकेशन झाल्यांनंतर अवघ्या दोन दिवसात कर्जाची रक्कम शेतकºयांच्या खात्यात टाकण्याबाबतच्या प्रशासकीय पातळीवर सुचना आहेत. त्यामुळे ‘आधार’ बेस असलेल्या या योजनेला महत्त्व आले आहे.
गावपातळीवर झळकणार याद्या
शेतकºयांच्या याद्या अपलोड झाल्यानंतर गाव पातळीवर त्या याद्या लावण्यात येणार असून सोबतच युनीक आयडींटीटी क्रमांकही त्यासाबेत राहणार आहे. त्यात कर्ज किती आहे, आधार क्रमांक याचीही माहिती राहिल. त्याबाबत काही शंका असल्यास आपले सेवा केंद्रावर शेतकरी बायोमॅट्रीक पडताळणी करावी लागले. याद्यातील माहिती योग्य असल्यास आॅथेंटीकेशनचा योग्य पर्याय निवडला जाईल. माहिती योग्य नसल्यास शेतकरी ती रिजेक्ट करू शकतात.