शहरासह ग्रामीण भागात साखरेपेक्षा गूळच खातोय भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:24 AM2021-06-26T04:24:15+5:302021-06-26T04:24:15+5:30
प्रकृतीसाठी गूळ चांगला वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारातील साखरेचा वापर कमी करणे गरजेचे आहे. याउलट उत्तम आरोग्य राखण्यासाठी ...
प्रकृतीसाठी गूळ चांगला
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारातील साखरेचा वापर कमी करणे गरजेचे आहे. याउलट उत्तम आरोग्य राखण्यासाठी साखरेऐवजी गुळाचा वापर करावा. गुळामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असलेल्यांनी गुळाचे नियमित सेवन करावे.
- डॉ. पूजा तेरेदेसाई, आहारतज्ज्ञ.
गुळाचा चहा बनले स्टेटस
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गुळाचा चहा पिण्याची एक क्रेझ निर्माण झाली आहे. सुरुवातीला शहरात गुळाच्या चहाची विक्री करणारे एकच दुकान होते.
हळूहळू बऱ्याच ठिकाणी आता गुळाचा चहा मिळू लागला आहे. गुळाच्या चहाचे दर साखरेच्या चहाच्या दरापेक्षा जास्त आहे. यामुळे साखरेपेक्षा गुळाचा चहा पिणे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते.
अलीकडच्या काळात तरुणाईसह सर्वच वयोगटांतील नागरिकांमध्ये गुळाचा चहा पितानाचे स्टेटस व्हाॅट्सॲपला ठेवण्याची परंपरा आहे.
एवढेच नव्हे तर गुळाचा चहा पितानाचे छायाचित्र फेसबुक, यासारख्या सोशल मीडियावरही अपलोड करण्यात येत आहे.
गावात मात्र साखरच!
ग्रामीण भागात आजही गुळापेक्षा साखरेचाच वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. चहादेखील साखरेचाच पिण्याकडे त्यांचा कल असल्याचे दिसून येते. साखरेच्या तुलनेत ग्रामीण भागात गुळाची विक्री २५ टक्के आहे. गुळाचे भाव वाढल्याने विक्रीवर परिणाम झाला आहे.
- करण देशमुख, किराणा दुकानदार.
शहरात साखरेपेक्षा गुळालाच मागणी
गुळाचे भाव साखरेपेक्षा जास्त असो तरी शहरी भागात गुळालाच जास्त मागणी आहे. साखरेपेक्षा गुळाचे पदार्थ सेवन करण्याकडे शहरी भागातील नागरिकांचा कल आहे. अनेकांना आरोग्याच्या तक्रारी असल्याने डॉक्टरांकडूनदेखील गुळाचे सेवन करण्याचा सल्ला देण्यात येतो.
- अमोल हिरळकर, व्यापारी.
शहरात गुळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. असे असले तरी साखरेचीदेखील मागणी कमी नाही. साखरेच्या व गुळाच्या विक्रीमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त तफावत नाही. गुळाचे भाव जास्त असल्याने गूळ आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असला तरी सर्वांनाच परवडत नाही.
- शेख मतीन, व्यापारी.