नगरविकास आघाडी ठरणार अनेकांना पर्याय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:30 AM2021-02-15T04:30:59+5:302021-02-15T04:30:59+5:30
चिखली : ग्रा.पं.निवडणुकीनंतर आता नगरपालिका निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर इच्छुकांची उमेदवारीसाठी लगबग वाढली आहे. चिखलीसारख्या मोठ्या ...
चिखली : ग्रा.पं.निवडणुकीनंतर आता नगरपालिका निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर इच्छुकांची उमेदवारीसाठी लगबग वाढली आहे. चिखलीसारख्या मोठ्या नगरपालिकेत नगरसेवक होण्यासाठी आजवर केवळ दोनच पर्याय उपलब्ध होते. परिणामी, जिंकण्याची क्षमता असूनही अनेकांचा वेळोवेळी केवळ हिरमोडच झालेला पहावयास मिळाला. अशा स्थितीत सर्व जुन्या-नव्यांची मोट बांधून प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे यांनी यंदाची न.प.निवडणूक 'नगरविकास आघाडी'च्या माध्यमातून जिंकण्याच्या इराद्याने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांच्या या अजेंड्यामुळे काँग्रेस व भाजपा या दोन्ही प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांपुढे अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.
चिखली पालिकेवर आजवर केवळ काँग्रेस आणि भाजपा या दोन पक्षांनी सत्ता गाजविली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन पक्षांना अद्यापही साजेशे यश मिळविता आले नाही. एक किंवा दोन नगरसेवकांच्या बळावर शिवसेना व राष्ट्रवादीने ताटातील लोणच्याचे काम आजवर केले. पालिकेत आजवर राकाँ व शिवसेनेच्या ज्या नगरसेवकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, ती त्यांच्या वैयक्तिक प्रतिमेमुळे. या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी चिखली पालिकेच्या निवडणुकीत कधी फारसे लक्ष घातल्याचे आजवर दिसले नाही. त्यामुळे येथे नेहमीच काँग्रेस विरूध्द भाजपा अशीच लढत झालेली आहे. पर्यायाने पालिकेत जाण्यासाठी अनेक इच्छुकांना काँग्रेस अथवा भाजपाशिवाय दुसरा कोणताही सक्षम पर्याय येथे आजवर नव्हता. राज्यातील सत्ता समीकरणाचे गणित पाहता पालिकेची यंदाची निवडणूक भाजपा विरूध्द महाविकास आघाडी अशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायाने भाजपाला चिखली पालिकेची खिंड एकाकीच लढावी लागेल तर काँग्रेससाठी यंदाची निवडणूक थोडी डोकेदुखीची ठरू पाहत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढल्यास काँग्रेसला हक्काच्या जागा शिवसेना व राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकाव्या लागतील, ही बाब श्रेष्ठींसह काँग्रेसकडून इच्छुकांना पचनी पडण्याची शक्यता तशी कमीच. सामाजिक समीकरण पाहता येथील मुस्लिम समाज एखाद-दोन निवडणुकींचा अपवाद वगळता कायम काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे राहिला आहे. मुस्लिम समाजातील इच्छुक नेहमीच काँग्रेसच्या तिकिटासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे या समाजात तिकिटासाठीची स्पर्धा कायम दिसून येते. यामध्ये प्रसंगी दबावतंत्राचा वापर करून अनेक इच्छुकांना घरी बसविल्या जात असल्याने मुस्लिम समाजातही नाराजांचा एक गट सक्रिय आहे.
नव्या-जुन्यांना हेरून मोट बांधण्याचे काम
यासह पक्षाचे तिकीट मिळण्यासाठी पक्षश्रेंष्ठीपुढे शक्तिप्रदर्शनाची एकही संधी न सोडता कायम धडपडत असणारे प्रमुख पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व आपल्या भागात वैयक्तिक संबंधांमुळे लोकप्रिय असतील अशा सर्व नव्या-जुन्यांना हेरून त्यांची मोट बांधण्याचे काम गत काही दिवसांपासून प्राचार्य डॉ.नीलेश गावंडे यांनी कासवगतीने चालविले असल्याचे जाणकार सांगत आहेत.