बुलडाण्यात बनणार शहरी बेघर निवारा; सर्व्हेक्षणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 03:31 PM2019-06-16T15:31:31+5:302019-06-16T15:34:55+5:30
बुलडाणा शहरात शहरी बेघरांसाठी कायमस्वरुपी निवारा उभारणे अनिवार्य करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शहरातील बेघर लोकसख्येच्या सर्व्हेक्षणास बुलडाणा शहरात प्रारंभ करण्यात आला असून २० जून २०१९ पर्यंत हे सर्व्हेक्षण सुरू राहणार आहे. दरम्यान, सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या बुलडाणा शहरात शहरी बेघरांसाठी कायमस्वरुपी निवारा उभारणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासंदर्भाने बुलडाणा पालिकेने हे पाऊल टाकले आहे.
जानेवारी २०१९ पासून बुलडाणा शहरातील गुप्ता शाळेमध्ये तुर्तास तात्पुरत्या स्वरुपात शहरी बेघर निवारा उभारण्यात आला असून सध्य स्थितीत येथे तीन व्यक्ती आश्रयास आहे. पूर्वी येथे नऊ निराधार व्यक्ती आश्रयास होते. त्यापैकी सहा जणांचे रिहॅबिलिटेशन करण्यात आल्याने तुर्तास येथे तीन व्यक्ती आहेत. केंद्र सरकारच्या दिनदयाळ अंत्योदय योजना तथा राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानातंर्गत अनुषंगीक विषयान्वये शहरात १४ जून २०१९ पासून सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने त्रयस्थ संस्थेमार्फत सर्व्हेक्षण करण्यात येत असून फुटपाथवर, चौकात, उड्डाणपुलाखाली, बसस्थानक परिसरात राहणाऱ्यांचे यात सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. जे लोक रस्त्यावर किंवा अयोग्य अशा ठिकाणी विपरीत स्थितीत राहतात त्यांच्यासाठी हा उपक्रम उपयुक्त आहे. या ठिकाणी संबंधितांना सर्व आवश्यक मुलभूत सुविधा पुरविण्यात येतात. सोबतच बेघर निवारा कक्षाकडून त्यांना एक ओळखपत्र देण्यासोबतच सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीकोणातून त्यांना सुविधाही पुरविण्यात येतात. सध्या करण्यात येणारे हे सर्व्हेक्षण दिवस-रात्र स्वरुपात करण्यात येतेय. त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात ५३ शहरात सध्या शहरी बेघर निवारा
राज्यात ५३ शहरात सध्या शहरी बेघर निवारा सुरू झाला आहे. प्रामुख्याने जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असा निवारा असणे अनिवार्य करण्यात आले आहे. येथे बेघर, भिकारी व तत्सम व्यक्तींना विनामुल्य नागरी सुविधा पुरविण्यात येतात. सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीकोणातूनही येथे सुविधा दिल्या जात असल्याचे पालिकेतील सुत्रांनी स्पष्ट केले.
प्रामुख्याने ज्या शहरांची संख्या एक लाखांची आहे अशा शहरात हा निवारा उभारण्यात येतो. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तो उभारण्यात आला आहे.