शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरच जनतेच्या सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:25 AM2021-06-01T04:25:55+5:302021-06-01T04:25:55+5:30
स्थानिक नगर परिषद कार्यालयाच्या आवारात पालिकेचे हे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी शासकीय मान्यता मिळाली असून, या ...
स्थानिक नगर परिषद कार्यालयाच्या आवारात पालिकेचे हे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी शासकीय मान्यता मिळाली असून, या ठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी, दोन अधिपरिचारिका, एक परिसेविका, पाच स्त्री आरोग्य सेविका, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक शिपाई व एक संगणक चालक अशी एकूण १२ जणांची चमू आरोग्यसेवा देणार आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत स्त्रिया आणि मुलांच्या आरोग्यासंदर्भाने आखलेले राष्ट्रीय कार्यक्रम राबविणे, विविध रोगांवर लसीकरण करणे, गरोदरपण, बाळंतपण आणि बाळंतपणानंतर लागणारी आरोग्य सेवा पुरविणे, शाळेतल्या मुलांची वैद्यकीय तपासणी आणि उपचार, विविध आजारांवर उपचार, आजार रोखण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी आरोग्य प्रशिक्षण, रोग निदान, उपचार आणि रोगांच्या प्रतिबंधासाठी मोहीम राबविणे. यात्रा, आठवडी बाजारांच्या ठिकाणी आरोग्य सेवा पुरवणे, जनरल ओपीडी, आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. यासाठी शासनाची परवानगी मिळाली असून, लवकरच ते जनतेच्या सेवेसाठी रूजू करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांनी दिली आहे. नगराध्यक्षा बोंद्रे यांच्या जनहिताच्या निर्णयाने उभारण्यात येणाऱ्या या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये इतर सर्वसाधारण रुग्णांसह कोरोना रुग्णांचा देखील उपचार करण्यात येणार असल्याचे सूतोवाच डॉ. प्राची तनपुरे यांनी केले आहे.
या सुविधा होणार उपलब्ध
पालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मातृत्व, बाल स्वास्थ्य, लसीकरण, माता बाल संगोपन व मार्गदर्शन, मोफत औषधी, नियमित लसीकरण, कुटुंब कल्याण नियोजन, पॅथॉलॉजी, स्वास्थ्य शिबिर, कोरोना तपासणी व लसीकरण, असंसर्गजन्य रोग, शुगर, रक्तदाब, कॅन्सर तपासणी निदान, साथीच्या आजारावर नियंत्रण, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी व महत्त्वपूर्ण आकडेवारी गोळा करणे, आदी सुविधा मिळणार आहेत.