सोईच्या बदलीसाठी दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 05:26 PM2019-06-11T17:26:08+5:302019-06-11T17:26:25+5:30
सोईच्या बदलीसाठी अनेक शिक्षक दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेत असल्याने खºया दिव्यांगावर एकप्रकारे अन्याय होत असल्याचे चित्र आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचे सत्र सुरू असून, यंदाच्या या बदलीप्रक्रियेत ४० ते ५० टक्क्याच्या जवळपास शिक्षक दिव्यांग आहेत. सोईच्या बदलीसाठी अनेक शिक्षक दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेत असल्याने खºया दिव्यांगावर एकप्रकारे अन्याय होत असल्याचे चित्र आहे.
प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यामध्ये कुठलाच गैरप्रकार होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाकडून बदली प्रक्रियेची संपुर्ण कामे आॅनलाइन करण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेची कामे सुरू आहेत. ६ जूनपर्यंत जिल्ह्यातील ६ हजार ७७२ शिक्षकांचे शिक्षक बदली पोट्रलवर मॅपिंग करण्यात आले. त्यामधून संवर्ग एक, संवर्ग दोन, संवर्ग तीन व संवर्ग चार अशा चार टप्प्यातील बदलीपात्र शिक्षकांची यादी काढण्यात आली. त्यानंतर बदली पोट्रलवर बदलीपात्र शिक्षकांसाठी ७ जून रोजी सकाळी ७ वाजेपासून आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. बदलीपात्र शिक्षकांमध्ये मराठी माध्यमाचे ९७८ व उर्दू माध्यमाचे ११७ बदलीपात्र शिक्षक निघाले. त्यातील ४० ते ५० टक्के शिक्षक हे दिव्यांग असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावर्षी दिव्यांग प्रमाणपत्र अनेक शिक्षकांनी काढलेले आहे. मागील वर्षी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावरून काही शिक्षकांनी आवाज उठवला होता. मात्र त्यावर काहीच कार्यवाही झाली नसल्याने बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढणाºया शिक्षकांना एकप्रकारे अभयच मिळाले. परिणामस्वरून दिव्यांग शिक्षकांचे प्रमाण यंदा वाढलेले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दिव्यांगाची संख्या गुलदस्त्यात
बुलडाणा तालुक्यात बदलीपात्र ८७ शिक्षकांपैकी ३५ शिक्षक दिव्यांग आहेत. तर चिखली तालुक्यात १२० पैकी ५३ शिक्षक दिव्यांग असल्याची माहिती आहे. बदलीपात्र शिक्षकांमध्ये मागील वर्षी पेक्षा यावर्षी किती दिव्यांग वाढले याची संख्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाने गुलदस्त्यात ठेवली आहे. मात्र दिव्यांगाची संख्या वाढल्याचे सांगण्यात आले आहे.
बदली पात्र शिक्षकांमध्ये दिव्यांगाची संख्या यावर्षी वाढलेली आहे. मात्र शिक्षकांकडून सादर केले जाणारे वैद्यकीय विभागाचे दिव्यांग प्रमाणपत्रच आम्हाला ग्राह्य धारवे लागते. त्यावर कारवाई करण्यासाठी आपल्याकडे तरतूद नाही.
- एस. टी. व ऱ्हाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.