शेती मशागतीत यंत्राचा वापर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:36 AM2021-05-07T04:36:34+5:302021-05-07T04:36:34+5:30
धामणगाव धाडः चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांना बैलजाेडी ठेवणे कठीण झाले आहे. त्यामुळे, शेती मशागतीसाठी यंत्राचा वापर वाढल्याचे चित्र धामणगाव बढे ...
धामणगाव धाडः चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांना बैलजाेडी ठेवणे कठीण झाले आहे. त्यामुळे, शेती मशागतीसाठी यंत्राचा वापर वाढल्याचे चित्र धामणगाव बढे परिसरात आहे.
धामणगाव परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. नांगरणी, वखरणी, आदी कामे सुरू केली आहेत. कोरोना संकटाशी सामना करीत असतानाच शेतकरी कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
शेतकरीराजा यंदा नव्या जोमाने पुढील खरीप हंगामाच्या तयारीला लागलेला दिसत आहे. मागील पाच-सात वर्षांपासून शेतकऱ्यांवर नैसर्गिक दुष्काळी संकटे येत आहेत. परंतु शेतकरीराजा अजूनही निसर्गाशी सामना करतो आहे. जमिनीचा पोत, जडणघडण सुधारण्यासाठी पूर्वमशागतीची कामे करताना दिसत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर शेतकरी महिनाभर आपापल्या घरामध्येच होता. मात्र, शेतकरी वर्गाने घरीच राहून चालणार नाही. शासनानेही याकरिता कृषी क्षेत्राला काही नियम, अटी लागू करून शेतीची कामे व शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याला मान्यता दिल्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागत कामात व्यस्त आहे. शेतकरी शेतातील काडी कचरा, शेणखत, नांगरणी असली कामे करीत आहे. खरीप हंगाम लवकरच सुरू हाेणार आहे.
काेराेनाचा फटका
खरीप हंगामापूर्वीच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रशासनाने कृषीविषयक दुकानांची वेळ वाढवून दिली आहे. मात्र, संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. बी-बियाणे, तसेच खतेही महागल्याचे चित्र आहे. आधीच पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. दुसरीकडे भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांवर आणखी एक संकट काेसळले आहे.