विरोधकांकडून स्व:स्वार्थासाठीच सत्तेचा वापर - पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 05:18 PM2018-01-13T17:18:19+5:302018-01-13T17:29:50+5:30
खामगाव: स्वातंत्र्याच्या सात दशकात सत्ता उपभोगणा-या प्रस्थापितांनी केवळ गांधीजीच्या नावाचाच वापर केला. मात्र, महात्मा गांधीजीच्या स्वप्नांतील भारत निर्माणाच्या कार्यासाठी भाजप प्रयत्नशील असून, मोंदीच्या नेतृत्वात शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यास सुरूवात झाली आहे. स्वच्छ समाजाची निर्मिती ही परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याची ग्वाही महिला व बालकल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री ना. पंकजा मुंडे-पालवे यांनी येथे दिली.
लोकमत न्युज नेटवर्क
खामगाव: स्वातंत्र्याच्या सात दशकात सत्ता उपभोगणा-या प्रस्थापितांनी केवळ गांधीजीच्या नावाचाच वापर केला. मात्र, महात्मा गांधीजीच्या स्वप्नांतील भारत निर्माणाच्या कार्यासाठी भाजप प्रयत्नशील असून, मोंदीच्या नेतृत्वात शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यास सुरूवात झाली आहे. स्वच्छ समाजाची निर्मिती ही परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याची ग्वाही महिला व बालकल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री ना. पंकजा मुंडे-पालवे यांनी येथे दिली.
स्थानिक जिल्हा परिषद कन्या शाळेत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. आकाश फुंडकर, नगराध्यक्ष अनिताताई डवरे, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती श्वेताताई महाले, पंचायत समिती सभापती उर्मिलाताई गायकी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. ष्णमुख राजन, नगर परिषद उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार, समाज कल्याण सभापती गोपाळ गव्हाळे, जि.प. सदस्य जयश्रीताई टिकार, मालुबाई मानकर, वर्षा उंबरकार, रेखा महाले, पंचायत समिती उपसभापती भगवानसिंह सोळंके, गटविकास अधिकारी शिंदे, शत्रुघ्नं पाटील, गजानन देशमुख, नगर पालिकेच्या शिक्षण सभापती भाग्यश्री मानकर यांची उपस्थिती होती.
यावेळी मुंडे म्हणाल्या की, गरीबांच्या प्रत्येक घरात शौचालयाची निर्मिती करून स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. यासाठी बजेटमधील मोठ्या निधीची तरतूद ग्रामविकास खात्यासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचत असून, राज्याची अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे वाटचाल सुरू असून, मार्च महिन्यापर्यंत संपूर्ण राज्य हगणदरीमुक्त करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. स्त्री-भ्रूण हत्या थांबविण्यासाठीही शासन प्रयत्न असून, ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. जिजाऊंच्या जन्मभूमीतून या योजनेच्या जाणीव जागृती प्रचार रथाला सुरूवात झाली असून, सिंदखेड ते चोंढीपर्यत आणि नायगावपर्यंत जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या. खामगाव मतदार संघातील रस्ते विकासासाठी २६.५ कोटी रूपयांचा निधीही ग्रामविकास खात्याकडून देण्यात आला आहे. यामध्ये मतदार संघातील ५२ किलोमीटर पर्यंतच्या रस्त्यांची निर्मिती केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविक गटविकास अधिकारी शिंदे यांनी केले. संचलन अरविंद शिंगाडे यांनी केले. याप्रसंगी आ. आकाश फुंडकर यांचेही समयोचित भाषण झाले. या मार्गदर्शन मेळाव्याला अंगणवाडी सेविका, आशा सेविकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. यावेळी शिलाई मशीन, झेरॉक्स मशीनचे वितरण त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियान वकृत्व स्पर्धेतील मंजुश्री कळस्कार, वैष्णवी सोनटक्के यांच्यासह हगणदरी मुक्तीसाठी कार्यरत ग्रामसेवक, सरपंच तसेच आयएसओ मानांकन शाळांमधील शिक्षक, तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात यशस्वी कामगिरी करणाºया विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला. पशुसंवर्धन योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचेही वितरण ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे- पालवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे पंचायत समितीतंर्गत वैयक्तीक लाभार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटपही याप्रसंगी करण्यात आले.
उपेक्षीतांच्या उत्थानासाठी सरकारचे प्रयत्न- ना. फुंडकर
ग्रामीण विकासाच्या स्वप्नं पूर्तीच्या दिशेने राज्य शासनाची वाटचाल सुरू आहे. विकासाच्या परिवर्तनाची नांदी राज्यात सुरू आहे. शेतकºयांना पाणी, वीज आणि शेतमालाला भाव देण्यासाठी शासन कटीबध्द असून, उपेक्षीतांच्या उत्थानासाठी सरकारचे प्रयत्न असल्याची ग्वाही राज्याचे कृषी तथा फलोत्पादन मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी येथे दिली.