विज्ञानाचे प्रयोग वहीतच पूर्ण!
By Admin | Published: February 28, 2017 01:52 AM2017-02-28T01:52:21+5:302017-02-28T01:52:21+5:30
आज विज्ञान दिन: प्रात्यक्षिकालाही झटकल्या जात नाही प्रयोगशाळेतील धूळ
बुलडाणा, दि. २७- दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांंना विज्ञानाच्या प्रात्यक्षिकामध्ये पास होण्याची हमी शाळा, महाविद्यालयामधून मिळत असून, अनेक शाळांमधील प्रयोगशाळेत नाशवंत साहित्याची खरेदीच होत नसल्याचे दिसून आले आहे. बहुतांश शाळा, महाविद्यालयांमध्ये विज्ञानाचे प्रयोग हे प्रयोग वहीतच पूर्ण होत आहेत. प्रयोगशाळेतील साहित्यावरील धूळ प्रात्यक्षिकालाही झटकल्या जात नसल्याचे वास्तव २७ फेब्रुवारी रोजी ह्यलोकमतह्णने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे.
डॉ. सी. व्ही. रामन यांच्या शोधनिबंधास २८ फेब्रुवारी रोजी नोबेल मिळाल्याच्या निमित्ताने हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून पाळण्याची प्रथा १९८७ पासून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांंमध्ये वैज्ञानिकतेची आवड निर्माण करण्यासाठी व विज्ञानाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी शाळा, महाविद्यालयामध्ये विज्ञान प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात आली. शिक्षणात प्रात्यक्षिकावर भर दिला जावा, यासाठी दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये विज्ञानाच्या प्रयोगासाठी गुणदान ठेवण्यात आले आहे. महाविद्यालयांमध्ये किमान एक प्रयोगशाळा अपेक्षित आहे, तसेच ५00 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या प्रयोगशाळेत सहायक व परिचर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळेतील साहित्य हे दोन प्रकारचे असते. त्यामध्ये स्थायी व अस्थायी असे दोन प्रकार पडत असून, यातील अस्थायी साहित्यामध्ये नाशवंत केमिकल आदींचा समावेश असतो; मात्र जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये अस्थायी वस्तूची खरेदीच होत नाही. प्रयोग न करता विद्यार्थ्यांंना गुणदान केले जात असल्याने प्रात्यक्षिकाला महत्त्व न देता लेखी परीक्षेतील गुणांनाच अधिक महत्त्व दिल्या जाते. एखाद्या विद्यार्थ्यांला लेखी परीक्षा नाही दिली, तरी पास होण्याची हमी शाळा, महाविद्यालयातून मिळत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये प्रयोगशाळा, कर्मचारी, उपकरणे यावर शासन खर्च करते; मात्र त्याचा कुठलाच उपयोग होत नसल्याचे दिसून येते. बहुतांश प्रयोगशाळेतील धूळही झटकली जात नसल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे. जिल्ह्यातील काही नामवंत महाविद्यालयातदेखील बारावी परीक्षेपूर्वी महिनाभर प्रात्यक्षिक परीक्षेच्या तयारीचे केवळ सोपस्कार पूर्ण केले जातात. शाळा, महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील साहित्य धूळ खात असल्याने विज्ञान प्रात्यक्षिकांबद्दल अनास्था वाढत असल्याचे दिसून येत आहे.