वापरलेले रॅपीड टेस्ट किटस्, मास्क उघड्यावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:39 AM2021-08-13T04:39:24+5:302021-08-13T04:39:24+5:30
नागरिकांचे आरोग्य धोक्यात चिखली : कोरोनाचे रूग्ण घटल्यामुळे थोडे हायसे वाटत असतानाच शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास ...
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
चिखली : कोरोनाचे रूग्ण घटल्यामुळे थोडे हायसे वाटत असतानाच शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. यापृष्ठभूमीवर तालुका प्रशासनाने खबरदारच्या उपाययोजनाअंतर्गत शहरात प्रवेशणाऱ्या नागरिकांची ‘रॅपिड टेस्ट’ बंधनकारक केली आहे. यानुषंगाने शहरात पाच ठिकाणी तपासणीसाठीचे स्टॉल देखील लावण्यात आले आहेत. मात्र, याठिकाणी केल्या जाणाऱ्या ‘रॅपिड टेस्ट किटस्’ वापरानंतर सर्रासपणे रस्त्यावर फेकले जात आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असतानाच चिखली तालुक्यात पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. आजरोजी तालुक्याचा पॉझिटिव्ह रेट दिवसागणीक वाढत आहे. तपासणीतून दहा पैकी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने चिंता वाढली आहे.चिखली शहरात प्रवेशासाठी १० आॅगस्ट पासून ‘रॅपिड अॅन्टीजन’ तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने शहरातील श्री शिवाजी उद्यान, राऊतवाडी स्टॉप, सैलानी नगर, जफ्राबाद रोड टी- पाँईट व श्री शिवाजी विद्यालय या पाच ठिकाणी तपासणीसाठीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यातील राऊतवाडी येथील तपासणी स्टॉलमध्ये तपासणीसाठी वापरलेले किटस् सर्रासपणे रस्त्यावर फेकले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना तपासणीनंतरचे रॅपिड किटस्, मास्क, स्वॅब नमूने घेण्यासाठी वापरण्यात येणारे कॉटनस्वॅबच्या नळ्या आदी साहित्य स्टॉलच्या आजुबाजूला अत्यंत बेजबाबदारपणे फेकण्यात आले आहेत. याप्रकाराने या भागातील नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. दरम्यान शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढू नये यानुषंगाने तालुका प्रशासनासह आरोग्य विभाग योग्य ती खबरदारी घेत असतानाच आरोग्य विभागातील कर्मचारी आपल्या कर्तव्यात कसूर ठेवून आपल्या विभागाच्या कर्तव्य तत्परतेला नख लावण्याचे काम करीत असल्याने या प्रकाराबाबत तीव्र रोष देखील व्यक्त होत आहे.
शहरात पाच ठिकाणी तपासणी स्टॉल
आरोग्य विभागाद्वारे शहरात पाच ठिकाणी ‘रॅपिड अॅन्टीजेन’ तपासणीचे स्टॉल उभारले आहेत. या स्टॉलव्दारे ११ आॅगस्ट रोजी ५२९ तर १२ आॅगस्ट रोजी ५८४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या आहेत. दरम्यान शहरात मास्क, सामाजिक अंतर राखणे व इतर आवश्यक गोष्टींच्या पालनाबाबत सूचना देण्यात येत असून, नियम मोडणाऱ्यांवर दंड वसूल केला आहे.
या प्रकाराबाबत माहिती मिळताच संबंधित ठिकाणी जैविक कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. असा प्रकार पुन्हा घडणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच कोरोनाचा पुन्हा उद्रेक होवू नये म्हणून आरोग्य विभागाव्दारे सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत.
-डॉ.सांगळे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी, चिखली.