बुलडाणा जिल्हा परिषदेतील ४00 पदांच्या नियुक्त्या रखडल्या
By admin | Published: December 13, 2014 12:23 AM2014-12-13T00:23:10+5:302014-12-13T00:23:10+5:30
परीक्षा होऊन महिना उलटला; परीक्षार्थींना नियुक्ती आदेशाची प्रतीक्षा.
बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीने मागील महिन्यात घेतलेल्या परीक्षेचा निकाल लागून एक महिना उलटला; मात्र अद्यापही निवड झालेल्या ४00 परीक्षार्थींंना नियुक्ती आदेश मिळाले नाहीत. अशातच नुकत्याच झालेल्या आरोग्य सेवकाच्या परीक्षेत कॉपी करताना दोघांना पकडल्यामुळे व हे प्रकरण अद्याप चौकशीवर असल्यामुळे परीक्षार्थींंचा जीव टांगणीला लागला आहे. बुलडाणा जिल्हा निवड समितीने मागील महिन्यात जिल्हा परिषदेमध्ये रिक्त असलेल्या विविध संवर्गातील जवळपास ४00 पदांसाठी परीक्षा घेतली. २ नोव्हेंबरला सुरू झालेल्या या परीक्षा टप्प्याटप्प्याने घेऊन अखेरची परीक्षा ३0 नोव्हेंबरला आरोग्य सेवकांची झाली. प्रत्येक दिवशी झालेल्या परीक्षेचा निकाल लगेच दुसर्या दिवशी लावण्यात आला. त्यामुळे निकाल हाती येवून परीक्षेत पास झालेल्या परीक्षार्थींंना नियुक्ती आदेशाची प्रतीक्षा लागून आहे; मात्र जिल्हा परिषद प्रशासन निवड झालेल्या परीक्षार्थींंना नियुक्ती आदेश देण्यात दिरंगाई करीत आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या विविध विभागात अधिकारी व कर्मचार्यांचा रिक्त पदांचा प्रचंड अनुशेष आहे. महत्त्वाच्या पदावरील कर्मचार्यांची शेकडो पदे रिक्त असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम होत आहे. या रिक्त पदामुळे ग्रामीण भागातील लोकांची कामे होत नाहीत. आहे त्या कर्मचार्यावर कामाचा अतिरिक्त बोजा पडत असल्यामुळे कामाला न्याय मिळत नाही. परिणामी, सर्वच यंत्रणा प्रभावित झाली आहे.