वाशिम जिल्ह्यात तीन दिवसांत २९ हजार जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 12:30 PM2021-07-04T12:30:51+5:302021-07-04T12:30:57+5:30
Corona Vaccination : जिल्ह्यात १८ वर्षांवरील जास्तीतजास्त लोकांचे लसीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे जिल्ह्यात १८ वर्षांवरील जास्तीतजास्त लोकांचे लसीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. १ जुलैपासून सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत मोहिम सुरु ठेवली जात असून, गेल्या तीन दिवसांत २९४७९ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस २८ दिवसांनंतर, तसेच कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवसांनी दिला जातो. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पुरेशी रोगप्रतिकारकशक्ती तयार होण्याकरिता लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. दुसऱ्या डोससाठी जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लसीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला असून, जिल्हा सामान्य रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांसह इतर लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोसही दिला जात आहे. तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.
दुसऱ्या डोससाठी ऑनलाइन नोंदणीची गरज नाही
जिल्ह्यात सध्या १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असून, पहिल्या डोससाठी येताना १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी ‘कोविन’ ॲपवर नोंदणी करून अपॉईंटमेंट बुक करणे आवश्यक आहे. मात्र, ४५ वर्षांवरील नागरिक तसेच दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी आधार कार्ड घेऊन लसीकरण केंद्रावर यावे व लसीचा दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.