बुलडाणा जिल्ह्यात ३० ते ४४ वयोगटांतील लसीकरण प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 12:33 PM2021-06-20T12:33:52+5:302021-06-20T12:34:04+5:30
Corona Vaccine : जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्य शासनाच्या निर्देशानुसार बुलडाणा जिल्ह्यात ७ केंद्रांवर ३० ते ४४ वयोगटांतील व्यक्तींसाठी लसीकरण मोहीम १९ जूनपासून करण्यात आली आहे. दरम्यान, यामुळे आता जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील १८ टक्के नागरिकांनी किमान एक तरी कोरोना लसीचा डोस घेतलेला आहे.
परिणामी कोरोनाविरोधात लसीचे कवच निर्माण होण्यास प्रारंभ झाला आहे. २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एकाचवेळी लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी व गोंधळ टाळण्यासाठी राज्यात टप्प्याटप्प्यांने लसीकरणास प्रारंभ करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ३० ते ४४ वयोगटांतील व्यक्तींचे लसीकरण बुलडाणा जिल्ह्यातही सुरू करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ६२ हजार ८६७ व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आलेली आहे.
यापैकी ३ लाख ५१ हजार ७५३ नागरिकांनी लसीचा पहिला, तर १ लाख ११ हजार ११४ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास १८ टक्के नागरिकांनी लस घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्यातच पूर्वीप्रमाणे लसीचा तुटवडा नाही. आठवड्यातून किमान दोनदा बुलडाणा जिल्ह्यास लसीचा साठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे ३० ते ४४ वयोगटांसाठीही योग्य प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांची संख्या ही १२ लाख ५० हजारांच्या घरात आहे.
जिल्ह्यात सरासरी ९८ ते ९० केंद्रांवर सध्या लसीकरण करण्यात येत असून, ३० ते ४० वयोगटांसाठीही आता सात केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान सोमवारी या लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.