आरोग्य केंद्र नसलेल्या गावात कॅम्पद्वारे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:34 AM2021-04-17T04:34:53+5:302021-04-17T04:34:53+5:30
संपूर्ण जिल्ह्यातच तालुकास्तरावर अशा पद्धतीने मोहीम राबविण्यात येत असून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचू न शकणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना तथा ...
संपूर्ण जिल्ह्यातच तालुकास्तरावर अशा पद्धतीने मोहीम राबविण्यात येत असून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचू न शकणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना तथा वयोवृद्धांना याचा लाभ मिळणे त्यामुळे सुलभ झाले आहे. त्यानुषंगाने लसीकरणासाठी बुलडाणा तालुक्याला उपलब्ध झालेल्या डोसचे योग्य नियोजन करून या कॅम्पमध्ये नागरिकांना लस देण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरणाचा संभाव्य तुटवडा व उपलब्धता याचा विचार करून हे कॅम्प घेण्यात येत आहे.
दरम्यान या कॅम्पसाठी रायपूर प्राथमिक आरोग्य केद्रांतर्गत उपलब्ध झालेल्या २०० लसीचे डोस माळविहीर व रुखेड टेकाळे येथे पाठविण्यात येणार आहे. १४ एप्रिल रोजी रायपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ३०० डोस उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अपेक्षित लसीकरण होऊ न शकल्याने ज्या भागात प्राथमिक आरोग्य केंद्र नाही, अशा गावात लसीकरणाचा नागरिकांना थेट गावातच लाभ व्हावा या दृष्टिकोनातून हे डोस बोलावण्यात आले आहेत. जिल्ह्यात लसीकरणाची व्याप्ती वाढवून कोरोना संसर्ग रोखण्यास या माध्यमातून प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र, असे कॅम्प आयोजित करताना संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत होत असलेले लसीकरण प्रभावित होऊ नये या दृष्टीनेही महसूल व आरोग्य विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
दरम्यान रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपलब्ध असलेल्या काही लसी या कॅम्पसाठी वापरण्यात येत असल्याने या केंद्रावर लस घेण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांना त्रास सहन करावा लागला.