लसीकरण मोहीम, शिक्षकांकडे नोंदणीचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:33 AM2021-05-01T04:33:23+5:302021-05-01T04:33:23+5:30
बुलडाणा जिल्ह्याची लोकसंख्या २९ लाख ६४ हजार २२० च्या आसपास असून यापैकी जवळपास २० लाखांपेक्षा अधिक नागरिक हे ग्रामीण ...
बुलडाणा जिल्ह्याची लोकसंख्या २९ लाख ६४ हजार २२० च्या आसपास असून यापैकी जवळपास २० लाखांपेक्षा अधिक नागरिक हे ग्रामीण भागात राहतात. त्यातच वर्तमान स्थितीत ४४ टक्केच्या आसपास कोरोना बाधित रुग्ण हे ग्रामीण भागातील असल्याचे समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेच्या सीईओं भाग्यश्री विसपुते यांनी मोहिमेची व्याप्ती पाहता पाच सदस्यीय समिती यासाठी गठती केली आहे. जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांच्याकडे या मोहिमेचे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून तालुका तथा ग्रामपंचायत स्तरावर येत्या काळात होणाऱ्या लसीकरणासंदर्भात कृती आराखड्याचे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. दरम्यान ८७० ग्रामपंचायतीमध्ये गाव पातळीवर समित्या गठीत करण्यात येत असून मोठ्या गावांमध्ये लसीकरण मोहिमेत समन्वय रहावा म्हणून प्रसंगी दोन ते पाच समित्याही राहू शकतात. त्यामुळे ग्रामपातळीवरील अशा समित्यांची संख्या वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
गावपातळीवरील समितीमधील शिक्षक गावातील लसीकरण लाभार्थ्यांची नोंदणी करतील, आरोग्य विभागाचा कर्मचारी लस देतील, आशा वर्कस लसीकरणासंदर्भात जनजागृती करतील आणि ग्रामसेवक ग्रामपंचायत स्तरावर लसीकरण जागेच्या उपलब्धतेसह या मोहिमेत समन्वयकाची भूमिका निभावतील, असे जिल्हा परिषदेतील सूत्रांनी स्पष्ट केले.
--जिल्ह्याची साठवण क्षमता मोठी--
क्षेत्रफळाच्या दृष्टीने बुलडाणा जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. त्यातच ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात आहे. या केंद्रासह जिल्हास्तरावर मोठा लस भांडार आहे. यामध्ये जवळपास पाच लाख लसींचे डोस तांत्रिक बाबींची पूर्तता करून ठेवण्याची क्षमता आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने आतापासून पूर्वतयारी सुरू केली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.