वनग्राम देव्हारी पुनर्वसनाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:33 AM2021-03-21T04:33:45+5:302021-03-21T04:33:45+5:30
हा निधी मंजूर होऊन येथील २९८ कुटुंबाचे अन्यत्र स्थलांतर करण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठे यश त्यामुळे खा. प्रतापराव जाधव आणि ...
हा निधी मंजूर होऊन येथील २९८ कुटुंबाचे अन्यत्र स्थलांतर करण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठे यश त्यामुळे खा. प्रतापराव जाधव आणि आ. संजय गायकवाड यांना मिळाले आहे. यासाठी आ. संजय गायकवाड यांनी खा. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने प्रस्तावही पाठविण्यात आला होता. त्यास अखेर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे देव्हारी गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर ज्ञानगंगा अभयारण्यातील मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर कमी होऊन या अभयारण्याच्या संवर्धनास मोठा हातभार लागण्यास मदत होणार आहे विशेष म्हणजे ज्ञानगंगा अभयारण्यात मधल्या काळात टी१ सी१ वाघाचे अस्तित्व असल्याने हे ज्ञानगंगा अभयारण्य एक आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे. ज्ञानगंगा अभयारण्याचे क्षेत्र हे २० हजार ५२१ हेक्टर आहे. या अभयारण्यात ११८ प्रजातीच्या वनस्पती आणि प्राणी आहेत. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत या अभयारण्याचे संवर्धन हे काळाची गरज बनली आहे. या अभयारण्यात देव्हारी गावात २९८ कुटुंब वास्तव्यास असून त्यापैकी ४८ शेतकरी आहेत. त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी हे प्रयत्न चालवले होते. ३ मार्च रोजी पाठपुराव्यांतर्गत आ. संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन गावाच्या पुनर्वसनासाठी निधीची मागणी केली होती. त्यास हे यश आले आहे.
--प्रति कुटुंब दहा लाख रुपये--
देव्हारी गावातील प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपये मदत राशी दिल्या जाणार आहे. ४८ शेतकऱ्यांना दुय्यम निबंधकांच्या मूल्यांकनाच्या चारपट रक्कम दिली जाणार आहे. २९८ कुटुंबांना २९ कोटी ८० लाख रुपये तर शेती मोबदल्यासाठी २७ कोटी २७ लाख ६७ हजार ८०० रुपये असा हा निधी दिल्या जाईल.