वैशाख वणव्यात बहरतेय संजीवनी!
By admin | Published: May 14, 2017 02:27 AM2017-05-14T02:27:09+5:302017-05-14T02:27:09+5:30
उंच टेकडीवर ५१ कडूनिंबांचे संगोपन
अनिल गवई
खामगाव : वर्हाडातील संजीवनी म्हणून ओळखले जाणारे कडूनिंबाचे वृक्ष ऐन वैशाख वणव्यात बहरले आहेत. काळेगाव जि.बुलडाणा येथे तर ऐतिहासिक कानिफनाथ गडावर चक्क १00 फूट उंचीवर कडूनिंबाची नव्याने लावलेली ५१ झाडे बहरलेली दिसत आहेत.
वर्हाडात सर्वदूर दिसणारी कडूनिंबाची झाडे या भागाचे वैशिष्ट्य असून, ती वर्हाडाची ओळख बनली आहेत. कडूनिंबाच्या औषध गुणांमुळे त्यांना वर्हाडातील संजीवनी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. उन्हाळ्यात थंडगार छाया देणारी ही झाडे वर्षानुवर्षे जिवंत राहतात व मोठय़ा प्रमाणात विस्तार पावतात. कडूनिंबांच्या झाडांचे महत्त्व ओळखूनच खामगाव तालुक्यातील काळेगाव येथील ऐतिहासिक कानिफनाथ गडावर संस्थानच्यावतीने ५१ रोपट्यांची लागवड करण्यात आली.
तब्बल १00 फूट उंचावरील टेकडीवर लावलेली ही झाडे पाणीटंचाई व उन्हाळ्याच्या काळातही पाणी देऊन जगविण्याची कसरत संस्थानने गावकर्यांच्या मदतीने पार पाडली. त्यामुळे आज रोजी ही झाडे ५ ते ७ फुटापर्यंंत चांगली वाढली असून, ऐन वैशाखात त्यांना फुलोरा आला आहे. त्यामुळे वर्हाडातील ही संजीवनी येथे उत्तमरीत्या बहरलेली दिसते. याकरिता संस्थानचे अध्यक्ष ज्ञानदेव गायगोळ यांच्यासह विश्वस्त एकनाथ बोचरे, सुनील जोहरी, रामेश्वर रहाणे, दिलीप चव्हाण, रामभाऊ बगाडे, सुभाष अंबलकार, विलास इंगळे, जगन्नाथ बोचरे, वासुदेव मालठाणे, अनंता बोचरे, रामेश्वर कचवे, समाधान मांगटे, संजय दिवनाले, राजेंद्र बोचरे, नीलेश इंगळे, सोपान रहाणे आदींनी परिश्रम घेतले आहेत.
विशेष म्हणजे त्रिशुलाच्या आकारातील टेकडीवर वसलेल्या कानिफनाथ गडावर दुर्मीळ अजाण वृक्षांचीसुद्धा पाच झाडे असून, कानिफनाथांच्या दर्शनासाठी येणारे भाविक त्यांचेही दर्शन घेत असतात.